पारनेर | २७.१० | रयत समाचार
(Politics) भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (CPI) शताब्दी वर्षानिमित्त पारनेर तालुक्यातील ज्येष्ठ आणि निष्ठावान कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. या विशेष कार्यक्रमात पक्षाशी दीर्घकाळ निष्ठा राखत समाजवादी विचारांचा प्रसार करणारे ज्येष्ठ नेते कॉम्रेड पी.आर. कावरे, कॉम्रेड पुष्पाताई कावरे तसेच पक्षाचे माजी तालुका सचिव कॉम्रेड भास्करराव उर्फ शाहीर गायकवाड यांचा पक्षाचे राज्य सचिव कॉम्रेड सुभाष लांडे यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
(Politics) या सन्मान सोहळ्याला पक्षाचे जिल्हा सहसचिव कॉम्रेड सुधीर टोकेकर उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान उपस्थित कार्यकर्त्यांनी ज्येष्ठ कॉम्रेडच्या त्यागमय आणि संघर्षशील कार्याचा गौरव करत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील पिढीला समाजवादी चळवळीचे बळ देण्याचा निर्धार व्यक्त केला.
(Politics) कॉम्रेड पी.आर. यांनी दीर्घकाळ पक्षाच्या संघटनात्मक कार्यात योगदान दिले असून ग्रामीण जनतेच्या प्रश्नांवर त्यांनी सतत आवाज उठवला. कॉम्रेड पुष्पाताई यांनी महिलांच्या संघटनात सक्रिय भूमिका निभावत सामाजिक न्यायाचा लढा दिला आहे. तर कॉम्रेड भास्करराव यांनी आपल्या शाहीरी परंपरेतून जनजागृतीचा दीप प्रज्वलित ठेवला आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी “कामगार-किसान एकता जिंदाबाद” या घोषणांनी वातावरण दुमदुमवले आणि पक्षाच्या शताब्दी वर्षाला साजेशी प्रेरणादायी सांगता केली.
