World news | नगरच्या येंडे दांपत्याला संयुक्त राष्ट्रसंघाच्या सायबर कराराचे आमंत्रण; सायबर गुन्ह्यांविरोधात भारताचा अभिमानाचा ठसा

उपसंपादक | दिपक शिरसाठ

अहमदनगर |२६.१० | समीर मन्यार

(World news) सायबर गुन्ह्यांविरुद्धच्या जागतिक लढाईत भारतासाठी अभिमानाचा क्षण ठरलेली ऐतिहासिक घटना म्हणजे अहिल्यानगरच्या अ‍ॅड. डॉ. अशोक येंडे आणि प्रा. डॉ. जयश्री येंडे यांना संयुक्त राष्ट्रसंघाच्या सायबर गुन्ह्यांवरील करारनाम्याच्या (United Nations Convention Against Cybercrime) स्वाक्षरी समारंभासाठी आमंत्रित करण्यात आले. हा प्रतिष्ठित समारंभ हनोई (व्हिएतनाम) येथे लवकरच पार पडणार आहे.

(World news) २४ डिसेंबर २०२४ रोजी स्वीकारलेला हा करार सायबर गुन्ह्यांचे प्रतिबंध, तपासणी आणि खटल्यांमध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी जगातील पहिला सर्वसमावेशक जागतिक करार आहे. या ऐतिहासिक कार्यक्रमात सुमारे १०० देशांतील राष्ट्रप्रमुख, पंतप्रधान, उपपंतप्रधान, परराष्ट्रमंत्री आणि सचिव उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम व्हिएतनाम सरकार आणि संयुक्त राष्ट्रसंघ सचिवालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे.

(World news) समारंभाच्या उद्घाटन सत्रात व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष महामहिम लूँग कुआंग आणि संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस महामहिम अँटोनियो गुटेरेस प्रमुख भाषण करणार आहेत.

अ‍ॅड. डॉ. अशोक येंडे हे अहिल्यानगर येथील न्यू लॉ कॉलेजचे माजी प्राचार्य असून, सध्या ते सर्वोच्च न्यायालयाचे मध्यस्थ (Mediator) म्हणून कार्यरत आहेत. तर प्रा. डॉ. जयश्री येंडे या जिल्हा ग्राहक मंचाच्या माजी सदस्य असून, त्या देखील न्याय आणि सायबर शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत.

आपली भावना व्यक्त करताना अ‍ॅड. डॉ. येंडे म्हणाले, सायबर जग अधिक सुरक्षित करण्याच्या या ऐतिहासिक जागतिक प्रयत्नांचा भाग होणे ही आमच्यासाठी मोठा सन्मान आहे. हा करार विश्वास, सामायिक जबाबदारी आणि समन्वित आंतरराष्ट्रीय कृतीसाठी महत्त्वाचा टप्पा आहे. सायबर गुन्ह्यांविरुद्धची लढाई ही केवळ कायदेशीर किंवा तांत्रिक नसून ती जागतिक जबाबदारी आहे. अधिक मजबूत सहकार्य, क्षमता-वृद्धी आणि डिजिटल युगातील अधिकारांचे संरक्षण यासाठी हा करार मार्गदर्शक ठरेल.

सायबर कायदा, न्याय आणि डिजिटल प्रशासन या क्षेत्रातील त्यांच्या सातत्यपूर्ण कार्याची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली गेल्याने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब ठरली.

Share This Article