Public issue | जिल्हाधिकारी निवास प्रवेशद्वार चिखलमय; मनपाच्या दुर्लक्षामुळे आरोग्याशी खेळ; साथीचा रोग पसरण्याची भीती

अहमदनगर | २३ सप्टेंबर | रयत समाचार

(Public issue) महानगरपालिकेच्या प्रशासकीय दुर्लक्षामुळे जिल्हाधिकारी निवासाच्या प्रवेशद्वाराची अवस्था अक्षरशः दयनीय झाली आहे. दक्षिण दिशेचे स्टेशनरोडवरील प्रवेशद्वारासमोर खड्डे, चिखल, माती, कचरा व साचलेल्या पाण्याने भरून गेला आहे. परिणामी जिल्ह्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे हे निवासस्थानच जणू एखाद्या दुर्गम भागातील रस्त्यासारखे वाटू लागले आहे.

(Public issue) नुकत्याच झालेल्या पावसामुळे येथे पाणी साचून चिखल राडारोडा तयार झाला आहे. या ठिकाणी स्वच्छतेचा व जलनिस्सारणाचा कोणताही ठोस उपाय न केल्याने डेंग्यू, मलेरिया यांसारख्या साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत. इतकेच नव्हे तर जिल्ह्याचे प्रमुख अधिकारी असलेल्या कलेक्टर साहेबांनाच आपल्या घरात जाण्यासाठी या राड्यारोड्यातून मार्ग काढावा लागत आहे, ही दुर्दैवी बाब आहे.

(Public issue) शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी व जिल्हाधिकारी निवास परिसरातच जर अशी बिकट परिस्थिती असेल, तर अखंड अहिल्यानगर महानगरपालिका हद्दीसह शहराची काय अवस्था झाली असेल याची सहज कल्पना करता येते. तातडीने या समस्येकडे लक्ष देऊन रस्ता दुरुस्तीसह, पाणी काढणी व स्वच्छतेची कामे न झाल्यास नागरिकांचा रोष अधिक वाढण्याची शक्यता आहे.
अहिल्यानगर शहरात सध्या सर्वत्र मोठमोठाले कचऱ्याचे उकीरडे झाले आहेत. सर्वत्र डुक्करे, भटके कुत्रे, बेवारस जनावरे यांचा सुळसुळाट झालेला आहे. कोणत्याही शहरात डुक्कर असणे हे अस्वच्छतेचा पहिले लक्षण असते. डिएसपी चौक ते कोठला स्टँड या रस्त्यावर अंदाजे ५०/६० कुत्रे टोळीने फिरताना दिसत आहेत. या रस्त्याने शाळा कॉलेजचे विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक पायी जात असतात. या कुत्र्यांचा नागरिकांना मोठा धोका आहे. शहराची दुर्दशा पहाता आमची गौरवशाली अहिल्यानगर महानगरपालिका तातडीने डांगेमुक्त व स्वच्छ करण्याची तातडीची गरज आहे. अकार्यक्षम प्रशासक शहराचे वाटोळे करून टाकू शकतो. अशा कारभारामुळे शहरात साथीचे रोग पसरू शकतात. लोकांच्या आरोग्याशी खेळ चांगला नाही. शहराचे वातावरण चांगले, आरोग्यपुरक असणे ही काळाची गरज आहे.

हे ही वाचा : Public issue | बळजबरीच्या सिमेंट काँक्रीट रस्त्यांचे गुपीत; सिमेंट कंपन्यांच्या लाभासाठी पब्लिकच्या माथी सिमेंट प्रदूषण

Share This Article