मुंबई | २५ ऑगस्ट | रयत समाचार
(Cultural Politics) पुण्यात तथाकथित गोरक्षकांकडून माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर झालेल्या हल्ल्याची घटना अत्यंत निंदनीय असल्याची प्रतिक्रिया कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी दिली. या घटनेचा त्यांनी जाहीर निषेध करून सदाभाऊ खोत यांच्या शेतकरीहिताच्या भूमिकेला ठाम पाठिंबा दर्शविला.
“राजकीय मतभेद असले तरी जर कोणी शेतकऱ्यांच्या हिताची भूमिका मांडत असेल, तर ती भूमिका मान्य केलीच पाहिजे,” असे पवार म्हणाले.
(Cultural Politics) गोरक्षणाच्या नावाखाली गुंडगिरी करत शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या तथाकथित गोरक्षकांचं प्रमाण वाढत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सदाभाऊ खोत यांनी याच मुद्द्यावर आवाज उठविला होता. त्यामुळे त्यांच्यावर झालेला हल्ला हा लोकशाहीविरोधी प्रकार असल्याचे आमदार पवार यांनी सांगितले.
(Cultural Politics) सरकारने सदाभाऊ खोत यांच्यावर हल्ला करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करावी आणि गोरक्षणाच्या नावाखाली गुंडगिरी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळाव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.
