अर्थवार्ता | ०४ ऑगस्ट | राजेंद्र गांधी
(Crime) कुठल्याही सराईत दरोडेखोराला देखील लाजवेल अशी ही भ्रष्टाचार पध्दत वैभवशाली नगर अर्बन बँकेत राबविली गेली. नोव्हेंबर २०१७ मध्ये एका खातेदाराच्या खात्यातून परस्पर ४५ लाख रूपये बँकेच्या चेअरमनने काढून घेतले. नेमके त्याच दिवशी त्या खातेदाराच्या खात्याला चेक लागला. खात्यात पैसे नाहीत, म्हणून तो चेक रिटर्न झाला. खातेदार आश्चर्यचकित झाला. ४५ लाख रूपये खात्यात असताना चेक रिर्टन कसा झाला? हे पाहण्यासाठी तो धावत-पळत बँकेत गेला.
(Crime) सुरूवातीला त्याला उडावाउडवीची उत्तरे मिळाली, मग तो खातेदार पोलीस फिर्याद दाखल करायला निघाला. त्यानंतर बँकेच्या चेअरमनने त्याला केबिनमध्ये बोलाविले व सांगितले, “ते पैसे मी भरतो, तू थोड्या वेळ थांब.” चेअरमनने त्या खातेदाराला बसवून ठेवले व बँकेच्या शाखाधिकारीला सांगितले, “आशुतोष लांडगेच्या खात्यात ०२.५० कोटी रूपयांची १-१ रूपयांची नाणी भरल्याचे दाखव. त्या खात्याला ०२.५० कोटींचे क्रेडीट दाखव, त्यातून ४५ लाख या खातेदाराला व प्रत्येकी १ कोटी संगमनेरच्या उद्योगपतीला व खराडीच्या एका कर्जदाराला १ कोटी असे पाठवून दे. भरलेली ‘चिल्लर’ बँकेच्या मार्केटयार्ड शाखेला पाठविली, असे दाखवून जमा नावे करून टाक.”
अशा या विचित्र लूटमारीच्या ‘चिल्लर घोटाळा’ गुन्ह्याची आज जिल्हा न्यायालयात तारीख आहे.
(Crime) हा झाला गुन्ह्याचा अर्धा भाग. दुसऱ्या भागात हा गुन्हा झाला त्याच काळात नेमकी रिजर्व बँक तपासणी सुरू झाली. रिजर्व बँकेने हे पाहीले की, ०२.५० कोटी रूपये मुख्य शाखेतून मार्केटयार्ड शाखेला पाठविल्याचे दाखविले आहे परंतु प्रत्यक्षात मार्केटयार्ड शाखेला ही रक्कम मिळाल्याचे दिसत नाही. १७ दिवस झाले होते, ही रक्कम मार्केटयार्डला पोहचलीच नव्हती.
रिजर्व बँकेने याबाबत खुलासा मागितला, तसेच त्यांच्या तपासणी अहवालात नोंद करून लिहले. रिजर्व बँक कारवाई करेल. या भितीने बँकेचे चेअरमन, कर्ज उपसमिती व संचालक मंडळाने आशुतोष लांडगेला ०३ कोटी रूपयांचे वाढीव कर्ज दिल्याचे बनावट रेकॉर्ड तयार केले आणि ०२.५० कोटींची चोरी लपविली. बक्षीस म्हणून ५० लाख जादा काढले व एकूण ३ कोटींची लूटमार केली. १७ दिवस आधी उचल, नंतर कर्जाची मंजूरी, असे विचित्र रेकॉर्ड तयार झाले.
२०२० मध्ये रिजर्व बँकेचा तपासणी अहवाल माहीतीच्या अधिकारात रिजर्व बँकेकडून प्राप्त झाला. त्याचा अभ्यास करताना ही विचित्र लूटमार बँक बचाव समिती तथा बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांच्या लक्षात आली. राजेंद्र गांधी यांनी पाठपूरावा केल्यानंतर बँकेकडून हा ‘चिल्लर घोटाळ्या’चा गुन्हा दाखल करण्यात आला.
हे पैसे अद्याप वसूल झालेले नाहीत. जर राजेंद्र गांधी यांनी अभ्यास केला नसता तर ? हे प्रकरण दाबले गेले असते. बँक बंद पाडल्यानंतर वसूली झालीच नाही, असे दाखवून सगळे रफा-दफा केले असते.
हे ही वाचा : Political Economy: बोनस : राजकीय अर्थव्यवस्था समजून घ्या, अर्थसाक्षर व्हा– संजीव चांदोरकर
india news | अहमदनगरमधे शिक्षणाचे 1 ले बीज लावणारी ‘अमेरिकन मराठी मिशनरी’ – कामिल पारखे
