नाशिक | १६ जून | प्रतिनिधी
(bureaucracy) “हा विनोद समजावा की देशाच्या प्रशासनाचे दुर्दैव म्हणावे?” असा संतप्त सवाल करत निवृत्त सनदी अधिकारी महेश झगडे यांनी इंद्रायणी नदीवरील एका अपूर्ण नियोजनाच्या पूलाचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत, प्रशासनाच्या बेफिकिरीवर कठोर शब्दांत ताशेरे ओढले आहेत.
(bureaucracy) हा पूल पूर्णपणे बांधलेला असूनही दोन्ही बाजूंना कुठलाही रस्ता नाही. दोन्ही टोकांना रस्ता न जोडलेला असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाने हा पूल बांधल्याचे धक्कादायक वास्तव खुद्द महेश झगडे यांनी त्यांच्या प्रत्यक्ष पाहणीतून मांडले.
“हा खर्च पूर्णपणे अनावश्यक होता. हाच निधी तिथे वापरला असता, जिथे पुलाची तातडीची गरज होती, तर त्याचा जनतेला फायदा झाला असता,” असे झगडे यांनी स्पष्टपणे सांगितले.
(bureaucracy) २०१६ साली पीएमआरडीए आयुक्त पदावर कार्यरत असताना त्यांनी पुणे परिसरातील रिंग रोडसाठी संपूर्ण ७४०० चौ. कि.मी. क्षेत्र स्वतः पायपीट करत पाहिले. त्याच दरम्यान, देहूपुढे इंद्रायणी नदीवरील हा विचित्र पूल त्यांच्या नजरेस पडला. संपूर्ण बांधलेला पूल, पण दोन्ही टोकांना रस्ताच नाही!

