(Press) आज ३० मे २०२५, हा दिवस संपुर्ण भारतभर ‘हिंदी पत्रकारिता दिवस’ म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी ता. ३० मे १८२६ रोजी, भारतातील पहिले हिंदी वृत्तपत्र ‘उदन्त मार्तंड’ हे हिंदी साप्ताहिक प्रकाशिक झाले. उदन्त मार्तंड या अर्थ म्हणजे उदय होत असलेला सूर्य. पंडित जुगल किशोर शुक्ल या दूरदृष्टी असलेल्या संपादकाने कोलकाता (कलकत्ता) येथून या साप्ताहिक वृत्तपत्राची सुरुवात केली.
(Press) त्याकाळी भारतात इंग्रजी सत्तेचा प्रभाव प्रचंड होता. इंग्रजी व बांग्ला भाषेत अनेक वृत्तपत्रे प्रसिद्ध होत होती, मात्र हिंदी भाषिक जनतेसाठी काहीच नव्हते. ही पोकळी भरून काढण्यासाठी पंडित जुगल किशोर यांनी ‘उदन्त मार्तंड’ सुरू करून हिंदी पत्रकारितेच्या युगाची मुहूर्तमेढ रोवली.
(Press) ‘उदन्त मार्तंड’चे वैशिष्ट्ये म्हणजे हे साप्ताहिक वृत्तपत्र होते. हिंदी व उर्दूचा मिश्रित भाषाप्रयोग त्यात असायचा. शुद्ध देवनागरी लिपीत ते प्रकाशित होत होते. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयांची ते सातत्याने चिकित्सा करत असे. दुर्दैवाने, आर्थिक अडचणी व इंग्रज सरकारकडून मिळालेला असहयोग यामुळे ‘उदन्त मार्तंड’चा प्रवास फार काळ टिकला नाही. पण या अल्पकालीन प्रवासातही त्याने भारतीय समाजमनात पत्रकारितेचा बीजे रोवली.
आजचा काळ आणि पत्रकारितेच्या मूल्याचा विचार केला तर, आज पत्रकारिता विविध माध्यमांतून बहरत आहे. ऑनलाईन ईपेपर, प्रिंट वृत्तपत्रे, दूरदर्शन, रेडिओ, डिजिटल प्लॅटफॉर्म्स आणि विविध चॅनेल्स. पण पत्रकारितेचा मूळ हेतू यातून साध्य होतो का ? सत्य, पारदर्शकता आणि लोकशाही रक्षण आजही तितकाच महत्त्वाचा आहे. याकडे लक्ष दिले गेले पाहिजे.
हिंदी पत्रकारिता दिवस आपल्याला आपल्या भाषेतील अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा इतिहास आठवून देतो. हा केवळ एक दिवस साजरा करण्याचे नाही, तर पत्रकारितेच्या मूल्यांची जपणूक करण्याची आठवण करून देण्याचा आहे. टीम ‘रयत समाचार’ कडून सर्व पत्रकारांना आणि वाचकांना हिंदी पत्रकारिता दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.