पुणे | ९ मे | प्रतिनिधी
जिल्ह्यातील श्री क्षेत्र आळंदी येथे आयोजित करण्यात आलेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या हरिनाम सप्ताह सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहिले. त्यांनी जमलेल्या वारकरी बंधू भगिनींशी संवाद साधला.
भागवत धर्माचा विचार आणि महान परंपरेची पालखी आपल्या खांद्यावर घेऊन समर्थपणे पुढे चालणाऱ्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींना त्यांनी साष्टांग दंडवत घातला. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्माला ७५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने गेले सात दिवस आळंदीमध्ये सुरू असलेल्या हरिनाम सप्ताहात हजारो वारकरी सहभागी झालेत हे खरोखरच कौतुकास्पद आहे, असे ते यावेळी म्हणाले. या सोहळ्याला मला येता आले हे मी माझे भाग्य समजतो असे नमूद करत या सोहळ्याला शुभेच्छा दिल्या.
शिंदे पुढे म्हणाले, आळंदी ही ज्ञानभूमी असून इथे यापूर्वीही अनेकदा येण्याचे सौभाग्य मला लाभले. आषाढी वारीवेळी ज्ञानोबारायांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थित राहण्याची संधी मला मिळाली होती. मानवता, सेवाभाव आणि योगसाधनेचे महत्त्व ज्ञानेश्वरीतून पोहचवण्याचा प्रयत्न आजवर करण्यात आला असल्याचे याप्रसंगी सांगितले. त्यामुळेच एवढी वर्षे होऊनही या ग्रंथाचे महत्त्व अबाधित असल्याचे सांगितले. आज इथे बसलेल्या प्रत्येक वारकऱ्याच्या मनात एकच इच्छा आहे आणि ती म्हणजे इंद्रायणी नदी स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त व्हावी. राज्य शासनाने देखील हे काम मनावर घेतले असून इथे एसटीपी उभारून त्या माध्यमातून हे काम पूर्ण करण्यात येईल. केंद्र आणि राज्य शासनासोबतच वारकऱ्यांची देखील याकामी मदत लागणार असून ती देखील आपण कराल याची मला पूर्ण खात्री असल्याचे सांगितले.
तसेच मंदिर समितीच्या ४५० एकर जागेत ‘ज्ञानभूमी’ची उभारणी करण्याचा त्यांचा मानस आहे. या परिसराचा टप्प्याटप्याने विकास करण्यासाठी सरकार पूर्ण सहकार्य करेल. तसेच मंदिर परिसरात भक्त निवास उभारण्यासाठी नगरविकास विभागाच्या माध्यमातून २५ कोटी रुपये देण्याची घोषणा यावेळी त्यांनी केली.
यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार विजयबापू शिवतारे, उत्तम जानकर, धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले, माधवदास राठी महाराज, प्रमुख विश्वस्त योगी निरंजनदास, चैतन्य महाराज कबीर, रोहिणीताई पवार तसेच शिवसेना पदाधिकारी आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले हजारो वारकरी बंधू भगिनी उपस्थित होते.
