अहमदनगर | ८ मे | भैरवनाथ वाकळे
(Human rights) अहमदनगर (अहिल्यानगर) शहर व जिल्ह्यातील संपादक, पत्रकार, न्यूज चॅनेलवाले बंधू, सामाजिक, राजकीय, एनजीओ कार्यकर्ते यांना नम्र आवाहन, आपण जिल्ह्याचे महानगरपालिकेचे नाव बदलून लोकमाता अहिल्याबाई होळकर यांचे नाव दिले. हे नाव देताना त्यांचा आदर्श जगाने घ्यावा. त्यांच्या विचाराने काम चालावे हे अपेक्षित आहे. पण तसे होताना दिसत नाही. कालपरवाच अहिल्याबाईंच्या जन्मगावी चौंडी येथे राज्यमंत्री मडळाची बैठक झाली. येथे स्त्रीयांचे संरक्षण आणि सन्मान करण्याचा निर्णय झाला.
(Human rights) आपण सर्वजण स्थानिक येथीलच आहोत. आपला जन्म येथेच झालाय. आपले कार्यक्षेत्रही हेच आहे. आपण मरणारही याच गावात. आपण म्हातारे झाल्यावर आपल्या पुढच्या पिढ्या आपल्याला विचारणार आहेत. इतके वाईट होत असताना तुम्ही कुठे होता? म्हणून आजूबाजूला जर महिला भगिनींबाबत, शाळकरी लेकरांबाबत, गरीब कष्टकरी यांच्याबाबत अन्यायकारक, वाईट घडत असेल तर आपण पुढाकार घेणे गरजेचे आहे.
(Human rights) ता.५ मे च्या दिवशी भिंगाररोडच्या पोस्ट ऑफिस चौक म्हणजेच स्टेट बँकेसमोरील बाजूस निवारा करून अनेक वर्षांपासून रहात असलेल्या महिला, भगिनी, लेकरंबाळं यांच्यावर मोठा अन्याय केला गेला. त्यांना रस्त्याकडेला निवारा करू नका. येथे पोट भरू नका म्हणून मनपा प्रशासकांच्या आदेशाने अमानवी पध्दतीने हाकलून लावले. त्यात असहाय महिला, शाळकरी मुलमुली होती. त्यांना रात्री १२ वाजता आयशर ट्रकमधे घालून १२/१५ किमी गावाबाहेर सोडण्यात आले. ती लोकं सकाळी पुन्हा आली बाळंतीणी केंद्रीय विद्यालय परिसरातील काटवनात राहीली. त्यांचे संसारोपयोगी सामान, मुलांचे आधारकार्डसारखी कागदपत्रे, पिण्याचे पाण्याचे भांडे, जेवणाचे भांडे, विक्रीची झाडे, बॅट आदी साहित्य मनपाने लोक पुन्हा घेऊन निघून गेले. त्यांना येथे राहूच नका म्हणून रोज येवून दमदाटी सुरू आहे. या महिला लेकरं उपाशीतापाशी रडत बसतात. मोठी माणसं नुकसानीमुळे असहाय झाली आहेत. शहरातील ‘घर घर लंगर सेवा’ टीमने त्यांची जेवणाची व्यवस्था केली. कालही पुन्हा जेवण दिले. त्यांचा फोन आला, भाऊ, व्हिडीओ, बातम्या प्रसिद्ध झाल्यामुळे आम्हाला आता हाकलून देत आहेत. आमचे नुकसान होत आहे. हरजीतभाऊ सांगत होते, ती मंडळी खूप घाबरली आहेत. व्हिडीओ व बातम्या प्रसिद्ध केल्या म्हणून आता तुम्हाला येथे राहू देणार नाही, असा दम देत आहेत.
आपल्या घरात मांजर व्याली झाली असेल किंवा एखाद्या जनावराची आई बाळंतीण असेल, गोठ्यातील गाय व्याली असेल अथवा आपल्या घरातील माताभगिनी बाळंतीण असेल तर आपण किती जीव लावतो. कारण ती एक आई आहे, तीने जीव धोक्यात घालून एका जीवाला जन्म दिला. पण येथे अगदी निर्दयी काम सुरू आहे. दोन बाळंतीणींना अक्षरशः बेघर केले आहे. हे मोठे पाप आहे.
आपणा सर्वांना नम्र आवाहन आहे, या गंभीर विषयात अहमदनगरकरांसह अहिल्यानगरकर यांनी एकजुटीने या माणसांसाठी साथसंगत केली पाहिजे. बाळंतीण महिला भगिनींना बेघर करण्यापासून वाचविले पाहिजे. शाळा शिकणाऱ्या लहान मुलामुलींना शालाबाह्य करणे थांबविले पाहिजे. एकीकडे सरकार मुले शालाबाह्य राहू नये म्हणून सर्व्हे करून शाळेत घेऊन येतात, तर येथे लेकरांना बेघर करून शालाबाह्य केले जात आहे.
चांदबीबी, जिजाऊ, सावित्री, अहिल्येच्या लेकींचे संरक्षण करणे आपली जबाबदारी आहे.
काटवन खंडोबा मंदिर परिसर व वारूळाचा मारूती मंदिर परिसर येथे मनपाच्या जागा आहेत. शहरात HDD म्हणजेच हाऊसेस फॉर डिसहाऊसेस नावाने अनेक आरक्षणे आहेत. सरकारची प्रधानमंत्री आवास योजना आहेत. मनपाने या माणसांचा सर्व्हे करून योजनेमधे घर देवून या माणसांचे तेथे पुनर्वसन होऊ शकते. त्यामुळे महिलांचे संरक्षण होईल, लेकरांचे शिक्षण वाचेल, शालाबाह्य होण्यापासून वाचतील.
या लेकरांमधे एक छोटी मुलगी जन्मजात चित्रकार आहे. तिच्या शिक्षणाची जबाबदारी कोणी घेतली तर ती पुढे फार मोठी चित्रकार होईल. या जीवंत माणसांच्या संधी हिरावण्याचे काम निर्दयी मनपा प्रशासन करत आहेत.
प्रशासकीय कारभार म्हणजे लोकशाहीची हत्या, असे निवृत्त सनदी अधिकारी महेश झगडे यांनी दोन तीन महिन्यांपुर्वी मत मांडले होते. काल सर्वोच्च न्यायालयाने अगदी तेच म्हटले. निवडणूका घेऊन प्रशासकीय कारभार संपुष्टात आणा असा संकेत देत कालच सुप्रीम कोर्टाने निर्देशीत केले. प्रशासकीय कारभारावर लोकांचे काहीच नियंत्रण न राहिल्याने लोकशाही संपण्याची धोका असतो, हुकूमशाही सुरू होते. सध्या मनपात एकही नगरसेवक अथवा लोकप्रतिनिधी नाही. येथील कारभारावर कोणाचेच नियंत्रण नाही. प्रशासक कोणाचेच ऐकत नाही. शहरातील आजीमाजी नगरसेवक, त्याच वार्डातील नगरसेवक, सर्व राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते, राज्यातील सत्ताधारी पक्षाचे नेते कार्यकर्ते यांनी या गंभीर विषयात लक्ष घालून महिला भगिनी आणि गरीब कष्टकरी यांच्या न्यायाच्या बाजूने उभे रहावे. प्रत्यक्ष या माणसांना भेटून त्यांना मदत करावी. जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी लक्ष घालून हा अन्याय दूर करावा. त्यांच्या निवासस्थानाच्या हाकेच्या अंतरावर हा गंभार प्रकार सुरू आहे.
शहरातील मुळच्या लोकांना तर कोणीच वाली नाही. परंतु परराज्यातून आलेल्या गरीबांचा अतिक्रमणाच्या नावाखाली छळवाद सुरू आहे. आम्ही राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांचे या गंभीर विषयाकडे लक्ष वेधले आहे. त्याचबरोबर राज्य मानवीहक्क आयोग यांच्याही ही गोष्ट लक्षात आणून दिली आहे. आपण समाजातील जीवंत आणसे आहेत, हे लक्षात घेता. आपण सर्वांनी एकजुटीने या अन्यायाविरोधात काम केले पाहिजे. शहरात महिला व बाल संरक्षण खात्याचे कार्यालय आहे. स्नेहालय, माऊली सारख्या एनजीओ आहेत. अनेक समाजसेवक आहेत. आंबेडकरी संघटना, जिजाऊ ब्रिगेडसारख्या खमक्या संघटना आहेत. यासर्व माणसांच्या हितासाठी काम करतात, त्यांनी पुढाकार घेऊन अन्याय दूर करावा. या गरीब असहाय महिला, शाळकरी लेकरांना, पोट भरण्यासाठी आलेल्या माणसांना प्रत्यक्षात भेटून मदत करावी. मनपा अधिकारी यांना खोटी, अन्यायग्रस्त अतिक्रमण कारवाई करूच नये यासाठी आवाहन करावे.
ता.क. – आनंदधाम परिसरात एका पक्षाच्या मोठ्या कैलासवासी नेत्याचे अतिक्रमण आहे. त्यावर औरंगाबाद उच्च न्यायालयाने अहवाल देवून कारवाई करण्याचे सांगितले आहे. परंतु मनपा अतिक्रमण विभागाचे अधिकारी व प्रशासक कार्टातील ७७ तारखा झाल्या तरी अहमदनगर न्यायालयात अहवालच देत नाहीत. एकीकडे न्याय व्यवस्थेला जुमानायचे नाही तर दुसरीकडे अमानवी अन्याय अत्याचार करायचे. अशी हुकूमशाही पध्दती थांबविण्यासाठी शहरवासीयांना एकजूट व्हावे, असा कारभार थांबवावा. हा शहरातील माणसांच्या हिताचा नाही.
अहिल्याबाई होळकर यांच्या आदर्शावर कारभार करत महिला भगिनींचे संरक्षण करावे. त्यांचे पुनर्वसन करून घर मिळवून द्यावे. रोजगाराचे संरक्षण करावे. मनपाने बोगस अतिक्रमण कारवाई करू नये.
संबंधित व्हिडीओ पहा : https://www.youtube.com/live/eDRJkAn9s2g?si=N35GE9kkHEjysX9Q
हे ही वाचा : health | मृत्युनंतर दुसऱ्यांना जीवनदान द्या, पुढाकार घेऊन अवयवदान करा; Toll-Free Number : 1800-11-4770
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.