ग्रंथपरिचय | ३ मे | प्रमोद मुनघाटे
“संजो भरो ऽ ऽ’ संजोरी”
(Literature) ‘संजोरी’ हा झाडीच्या धानपट्ट्यातला धानचुरन्याच्या खळ्यावरील एक आनंदोत्सव. खूप दिवसांनी चालू असलेला धानचुरना संपल्याची आनंदविभोरावस्था. आपल्या दैवताची मनोभावे पूजा आटोपून चुरनेकरी व सख्यासोबत्यांसोबत तिखट जेवण आनंदाने खाणे म्हणजे ‘संजोरी’. कोंबडा, बकरा, नाहीतर लहानशी तलंग, आपल्या शेतातील दैवताची पूजा करुन त्याला भाव देणे व ते चिकन, मटन शेवटाच्या धानमोळ्यावेळी शेतावरच शिजवून सोबतीने मैत्रत्वाचे नाते जपत, कष्टकऱ्यांच्या कष्टाची कदर राखित समूहभोजनास्वाद म्हणजे ‘संजोरी’. थोडक्यात ‘संजोरी’ म्हणजे शेवटच्या धानचुरन्याची आवडीची ‘तिखट शिदोरी’. ही तिखट शिदोरी हरेकाच्या वाट्याला येईलच असे नाही. यासाठी एकतर निपुण चुरनेकरी असावा लागतो किंवा धानपाटलाचा पक्का सखासोबती. त्यालाच ‘संजोरी’ची चव चाखायला मिळते. नाहीतर कधीकधी ‘संजोरीचा कोंबडा न् हळुहळू बोंबला’ असे म्हणत गप बसावे लागते.”
– प्रा. धनराज खानोलकर
(Literature) थोडक्यात, ‘संजोरी’ म्हणजे महाराष्ट्राच्या पूर्वविदर्भातील झाडीपट्टीचा सफरनामा आहे. प्रा. खानोरकर यांनी झाडीपट्टीतील लोकजीवन, लोककला आणि झाडीबोलीतील नाटक-दंडार यांची लोकभाषेतच सफर घडवली आहे. झाडीपट्टीचे कोणतेही अंग त्यांनी राखून ठेवलेले नाही. महाराष्ट्रातल्या इतर भागांपेक्षा झाडीपट्टीचे वेगळेपण आणि वैशिष्ट्ये सांगणारी संहिता आहे. प्रत्येक लेखातून झाडीपट्टीतील लोकांच्या जगण्यातील सूर-ताल हा लेखक आपल्या शैलीदार शब्दात पकडतो. रंग, रस, ध्वनी अशा वाचकांच्या इंद्रियसंवेदना तृप्त करतो. शेतात रोवणी करणाऱ्या बायांच्या भावना त्यांच्या गीतातून कशा व्यक्त होतात, पोळ्याच्या सणातून शेतकऱ्यांचे आपल्या बैलांवरील प्रेम असो की झडत्यांमधून व्यक्त होणारे त्याचे रांगडे मन कसे बहरून येते, ते हा लेखक ज्या पद्धतीने सांगतो, त्यावरून हे पुस्तक म्हणजे झाडीपट्टीचा भौगोलिक इतिहासच आहे, असे वाटते.
(Literature) निसर्ग, ऋतू, हंगाम, मोसम ह्यांचे येणे आणि जाणे यावरच झाडीतील लोकांचे रागरंग खुलतात. मंडईमधून तरुणाई उंडारते, नाटक पाहायला कुटुंबासह लोक गर्दी करतात, तमाशा पाहायला रांगडे गडी दुपट्टे उडवतात आणि झडत्या म्हणताना वर्षभराचा राग-लोभ-वासना-विकार अट्टल झाडपी बाहेर काढतात, हे सगळे लोकजीवनाचे रंग ‘संजोरी’ मधून प्रा. धनराज खानोरकरांनी मुक्तहस्त उधळले आहेत. त्यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा.
– प्रमोद मुनघाटे, नागपूर
पुस्तक : संजोरी.
लेखक : धनराज खानोरकर.
मुखपृष्ठ : Anwar Husain.
प्रकाशक : भाषाविकास संशोधन. संस्था, कोल्हापूर.
पुस्तकासाठी संपर्क : पवन पाटील -7507168461
हे ही पहा : History | आचार्य प्र.के.अत्रे दिग्दर्शित ‘महात्मा फुले’ चित्रपट पहाण्यासाठी लिंक
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.