नाशिक | ३ एप्रिल | प्रतिनिधी
(Politics) येथील खरबंदापार्कमधील कॉम्रेड दत्ताजी देशमुख हॉलमध्ये २९ मार्च रोजी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शहर अधिवेशनाचा समारोप झाला. तल्हा शेख यांची पुन्हा शहर सचिवपदी तर सहसचिवपदी मीनाताई आढाव आणि प्राजक्ता कापडणे यांची निवड करण्यात आली. यावेळी राज्य सहसचिव राजू देसले व जिल्हासचिव महादेव खुडे यांच्या उपस्थितीत निवड झाली.
(Politics) अधिवेशनाच्या खुल्या सत्रात विशेष जनसुरक्षा विधेयकावर माहिती दिली. यावेळी ॲड. प्रभाकर वायचळे यांनी या विधेयकाचे सखोल विश्लेषण करत त्यातील अस्पष्टता आणि संभाव्य परिणामांविषयी चिंता व्यक्त केली. त्यांनी हे विधेयक लोकशाहीसाठी घातक ठरेल, असा इशारा दिला. नक्षलवादावर नियंत्रण मिळवण्याच्या नावाखाली सरकार सामान्य जनतेच्या आंदोलनांवर निर्बंध लादण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप त्यांनी केला. नव्या कायद्यांतर्गत कोणत्याही व्यक्ती अथवा संघटनेला एकतर्फी बेकायदेशीर ठरवले जाऊ शकते, संघटनांची मालमत्ता जप्त केली जाऊ शकते आणि अशा संघटनांना आर्थिक मदत करणाऱ्या व्यक्तींवरही कारवाई केली जाणार आहे. परिणामी, जनतेच्या हक्कांसाठी लढणाऱ्या संघटनांना संपवण्याचा हा प्रयत्न आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
(Politics) तसेच, बेकायदेशीर ठरवलेल्या संघटनांबाबत निर्णय घेताना सरकारला कोणत्याही सल्लागार मंडळाच्या शिफारसीचे बंधन नाही, तसेच कोणतीही माहिती गोपनीयतेच्या आधारावर दडपली जाऊ शकते. त्यामुळे हे विधेयक संविधानिक हक्कांचे उल्लंघन करणारे असल्याचा आरोप ॲड. वायचळे यांनी केला.
उद्घाटनसत्राच्या अध्यक्षस्थानी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सहसचिव कॉ.राजू देसले होते. त्यांनी देशातील वाढत्या दडपशाहीचा उल्लेख करताना दिल्लीतील शेतकरी आंदोलनात जेवण पुरवणाऱ्या कामगार संघटनेचे बँक खाते गोठवले गेले आणि कामगार नेत्याला अटक करण्यात आली, हा प्रकार फासीवादाच्या उंबरठ्यावर असल्याचे प्रतिपादन केले.
या विधेयकासाठी सूचना करणे गरजेचे आहे, त्यासोबतच आता थेट सरकारची लढा देऊन लोकशाहीला मारक असलेल्या जनसुरक्षा विधेयकाला हाणून पाडण्यासाठी व्यापक आंदोलने उभी करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
भारतीय कम्युनिस्ट पक्ष आपल्या शताब्दी वर्षाचे औचित्य साधून देशभर विविध पातळीवर अधिवेशने आयोजित करत आहे. जून महिन्यात नाशिक येथे महाराष्ट्र राज्य अधिवेशन होणार आहे. त्यापूर्वी झालेल्या या नाशिक शहर अधिवेशनात विविध ठरवांना मंजूर करून नवीन नेतृत्वाची निवड करण्यात आली. कॉ.तल्हा शेख यांची पुन्हा एकदा शहर सचिवपदी निवड झाली, तर सहसचिव म्हणून कॉ.मीनाताई आढाव आणि कॉ.प्राजक्ता कापडणे यांची निवड झाली. तसेच खजिनदारपदी पद्माकर इंगळे यांची निवड झाली. याशिवाय, २१ सदस्यीय शहर कौन्सिलची निवड देखील करण्यात आली.
यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते व्ही.डी. धनवटे, दत्तू तुपे, मनोहर पगारे, विराज देवांग, नामदेवराव बोराडे, रामचंद्र टिळे, पुनमचंद शिंदे, सुरेश गायकवाड, कैलास मोरे, अमोल लोणारी, शरद आहिरे, कैवल्य चंद्रात्रे, किरण धोंगडे आदी उपस्थित होते.

About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.