अहमदनगरमधील तोफखाना पोलिसांचा ‘माणुसकीचा गोड’ सुखद अनुभव
अहमदनगर | ९ जानेवारी | भैरवनाथ वाकळे
(human rights) उत्तर प्रदेशातील आजीबाई आपल्या मुलाकडे अहमदनगरमधील भिस्तबाग भागातील तपोवनरोडला पाहुण्या म्हणून आल्या. लेक, सुनबाई, नातवंडांचा लाड करून काही दिवस राहून पुन्हा गावाकडे जायच्या बेतात होत्या. रोजच्याप्रमाणे त्या चार वाजता पाय मोकळे करायला बाहेर पडल्या. फिरत फिरत ढवणवस्तीमागील कराळे मळा, बेहस्तबाग महालाचा परिसर असे करत थेट हुंडेकरी लॉनशेजारील चंदे बेकर्सपर्यंत जावून पोहोचल्या. तिथे गेल्यावर त्या गोंधळून गेल्या. रात्रीचे आठ वाजत आलेले. हवेत थंडीचा गारवा सुटलेला. आता कुठे जायचे सुचेना, अंधार पडत आलेला, माहिती सांगणारे कोणी नाही. त्यांनाही घराचा पत्ता सांगता येईना. अशा संभ्रमावस्थेत त्यांनी चंदे बेकरीजवळ बसून घेतले.
(human rights) इकडे आजीबाई घरी येईना म्हणून सुनबाई काळजीत. त्यांनी लेकरांना आजीला शोधायला पाठविले. लेकरांनाही आजी सापडेना. लेकर, सुनबाई रडकुंडीला आलेल्या. मुलगा पांढरीपुलावर रोजगारानिमित्त गेलेला. मदतीला हडकोतील सर्व माणसे धावली. शंभरएक लोकं आजीबाईला शोधायला बाहेर पडली. काही उत्साही तरूणांनी परिसरातील सर्व देवदेवळे शोधली. संपुर्ण परिसर पिंजून काढला. आजीबाई काही सापडेना. रात्रीचे दहा वाजत आलेले. कोणीच भाकरी खाल्लेल्या नव्हत्या. सर्वांचा एकच धोशा आजीबाई कुठे असेल? तहानभुक विसरून सर्वजण हडकोवासी काळजी चिंतेत शोधत होते.
इकडे आजीबाईंची आवस्था पाहून बेकरीजवळील विलास सोनवणे यांनी ११२ या पोलिसांच्या मदत क्रमांकावर फोन करून आजीबाईंची माहिती देत पोलिसांची मदत मागितली. तात्काळ तोफखाना पोलिस स्टेशनचे पोलीस शिपाई दीपक करंडे व सावळेराम क्षीरसागर आजीबाईंजवळ पोहोचले. या भागात महिलेची विचारपूस केली असता कुणीही माहिती सांगू शकले नाही. त्या कोणाच्याच ओळखीच्या निघाल्या नाहीत.
घाबरलेल्या आजीबाईंना तोफखाना पोलीस स्टेशन आणून पुढील कारवाई करत असताना शहरातील समाजसेविका संध्याताई मेढे यांचा तन्वीर शेख यांना फोन आला. त्यांनी आमच्या घराशेजारील आजीबाई परराज्यातील असून त्या मिसिंग झाल्याची फोनवर माहिती दिली. तन्वीर शेख यांच्यासह ठाणे अंमलदार बारगजे यांनी तात्काळ महिलेचा फोटो त्यांना दाखविल्या नंतर खात्री झाली की, कल्लन जग्गी राजभर या ६२ वर्षांच्या आजीबाई याच आहेत.
संध्याताई, आजीबाईंचे कुटूंब आणि परिसरातील लोकांसह तोफखान्यात पोहोचले. तोपर्यंत तोफखाना पोलिस स्टेशनमधील ठाणे अंमलदार रणजीत बारगजे, मदतनीस महेश पाखरे, सेक्टर ड्युटी पेट्रोल पोलीस कॉन्स्टेबल दीपक करंडे, सावळेराम क्षीरसागर, महिला पोलीस कॉन्स्टेबल रिंकी माडेकर, रेखा क्षीरसागर आदींनी आजीबाईंना धीर देत सहानुभूतीने विचारपूस केली. थंडी वाजत असल्याने त्यांना ब्लँकेट दिले. चहा, नास्ता, जेवणाची विचारपूस केली.
उत्तरप्रदेशातील आजीबाईंनी ‘त्यांच्या राज्यातील’ पोलिसी खाक्या ऐकलेला होता. त्यांना वाटले असेल की, हे पोलिसदेखील ‘तसेच’ असतील पण त्यांना महाराष्ट्रातील अहमदनगरमधील तोफखाना पोलिसांचा ‘माणुसकीचा गोड’ सुखद अनुभव आला.
(human rights) कुटुंबियांना पाहिल्यावर आजीबाईंच्या डोळ्यात आनंदाश्रू वाहत होते. लेक, सुनबाई व नातवंडे आजीसह अक्षरशः आनंदाने रडत होते. उत्तरप्रदेशातील लोकांना पोलिसांची अशी सकारात्मक बाजू अनुभवायलाच मिळत नाही, अशी सोबतच्या लोकांमधे चर्चा होती. सर्वांनी तोफखाना पोलिसांचे आभार मानत आनंदाने घरी निघून गेले. संध्याकाळी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत बेपत्ता झालेल्या उत्तर प्रदेशातील कल्लन जग्गी राजभर अखेर पोलिसांच्या माणुसकीने महेन्द्र राजभर या आपल्या लेकाच्या घरी सुखरूप पोहोचल्या.
हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा