अहमदनगर | वाजिद शेख
प्रत्येक विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती ही शिक्षकांची नैतिक जबाबदारी आहे. रयत शिक्षण संस्थेत सर्वसामान्यांची मुले घडत असताना, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शैक्षणिक संकुलातील शिक्षक कधीही कमी पडलेले नाही. विद्यार्थ्यांच्या यशातून शाळेची गुणवत्ता स्पष्ट होत आहे. शिक्षणाच्या डिजीटल युगात पुढे जाण्यासाठी डिजीटल शिक्षणपध्दती आत्मसात करण्याचे आवाहन रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य तथा माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी केले.
शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालयाच्या पालक शिक्षक सहविचार सभेत मार्गदर्शन करताना कळमकर बोलत होते. शाळेत झालेल्या सभेप्रसंगी जनरल बॉडी सदस्य अर्जुन पोकळे, ज्ञानदेव पांडुळे, शाळा सल्लागार समिती सदस्य अंबादास गारुडकर, शामराव व्यवहारे, उद्योजक जयद्रथ खकाळ, माध्यमिकच्या मुख्याध्यापिका छायाताई काकडे, प्राथमिकचे मुख्याध्यापक शिवाजी लंके, लक्ष्मण ठाणगे, फारुक रंगरेज आदी उपस्थित होते.
प्रारंभी पाहुण्यांचे स्वागत व रयत गीत सादर करण्यात आले. लक्ष्मीबाई व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन करुन सभेला सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविकात मुख्याध्यापिका छायाताई काकडे यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी शाळेत विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी पालक-शिक्षकांमधील संवाद महत्त्वाचा असून, यासाठी पालक शिक्षक संघ महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या सभेत माता-पालक शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करुन त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच विविध शैक्षणिक स्पर्धा परीक्षा व कला-क्रीडा क्षेत्रात यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
ज्ञानदेव पांडुळे यांनी विद्यार्थ्यांच्या यशासाठी आवश्यक असलेली पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांची त्रिसूत्री सांगितली. अर्जुनराव पोकळे म्हणाले की, केवळ उत्कृष्ट टक्केवारी म्हणजे गुणवत्ता नव्हे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणे, त्यासाठी आवश्यक आहे. एखाद्या विशेष गुणांमुळे कमी टक्के प्राप्त असलेला विद्यार्थी देखील भविष्यात यश प्राप्त करू शकतो. यासाठी विद्यार्थ्यांमधील क्षमता व गुण ओळखण्याची गरज असल्याचे सांगितले.
भरमसाठ पैसे कमावणारा डॉक्टर घडण्यापेक्षा, सामाजिक बांधिलकी जपणारा डॉक्टर घडणे म्हणजे उत्तम शिक्षण होय. समाजात उत्कृष्ट डॉक्टर बरोबर उत्कृष्ट शिक्षक घडविणे काळाची गरज बनली असल्याचेही त्यांनी सांगितले. तर बदललेल्या शैक्षणिक धोरणाविषयी माहिती दिली. उपस्थित पालकांनी देखील विविध सूचना मांडल्या. प्रभाकर थोरात, स्मिता पिसाळ व राजेंद्र देवकर या शिक्षकांनी पालकांशी संवाद साधून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप पालवे यांनी केले. आभार महादेव भद्रे यांनी मानले.
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.