रयत समाचार
धर्मवार्ता | १.६ | भैरवनाथ वाकळे
(Religion) भारतातील जैन धर्माचा इतिहास केवळ शहरांपुरता किंवा व्यापारी समाजापुरता मर्यादित नसून दुर्गम जंगलांमध्येही त्याचे अस्तित्व टिकून असल्याचे ‘सराक जैन’ धर्मियांच्या परंपरेतून दिसून येते. ओडिशा, झारखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांतील हजारो गावांमध्ये वास्तव्यास असलेला सराक समाज आजही जैन धर्माशी निगडित अनेक प्रथा, परंपरा आणि जीवनमूल्ये जपत असल्याने या समाजाबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
(Religion) जैन धर्म अभ्यासक डॉ. नीलम जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओडिशातील ‘रंगिया’ अथवा ‘रंगून तांती’ म्हणून ओळखला जाणारा सराक समाज हा जैन संस्कृतीचा वारसा जपणारा महत्त्वाचा घटक आहे. पुरी, कटक, गंजाम, खुर्दा, केंद्रपाडा आणि अन्य जिल्ह्यांमध्ये या समाजाची लक्षणीय वस्ती आहे. कपडे रंगविण्याचा व्यवसाय करणारा हा समाज पूर्णपणे शाकाहारी असून रात्रभोजन टाळतो. जीवहिंसा टाळण्यासाठी कपडे रंगविण्यासाठी वापरलेले पाणीही सूर्यास्तापूर्वी जमिनीत सोडण्याची त्यांची परंपरा आहे.
(Religion) सराक समाजातील अनेक कुटुंबे दरवर्षी खंडगिरी उदयगिरी येथील जैन तीर्थक्षेत्रांना भेट देतात. विशेष म्हणजे कार्तिक अमावस्येला ते दीपप्रज्वलन करून ‘ज्ञानप्राप्ती दिवस’ आणि ‘मुक्ती दिवस’ म्हणून साजरा करतात. कश्यप, नायक, पात्रा, महापात्रा, साहू यांसारख्या गोत्रांबरोबरच काही भागात आदिनाथ, अजितनाथ, मल्लिनाथ आणि पार्श्वनाथ यांसारख्या तीर्थंकरांच्या नावांशी संबंधित गोत्रांची परंपराही आढळते.
जैन धर्माच्या मूळ प्रवाहाशी जोडण्याचे प्रयत्न : सराक समाजाला पुन्हा जैन धर्माच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्याचे कार्य दिवंगत आचार्य ज्ञानसागर महाराज यांनी सुरू केले होते. त्यानंतर आचार्य शीतलसागर महाराज, आचार्य अक्षयसागर महाराज आणि इतर संतांनीही या कार्याला गती दिली. अनेक भागांमध्ये धार्मिक शिबिरे, प्रबोधन कार्यक्रम आणि जैन साहित्य उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
ॲड. योगेश पांडे यांची परखड भूमिका : याच संदर्भात सामाजिक कार्यकर्ते व अभ्यासक ॲड. योगेश पांडे यांनी अलीकडेच सराक समाजाविषयी भाष्य करताना जैन धर्माचा प्रसार सामान्य जनतेपर्यंत पोहोचण्याची गरज व्यक्त केली. भारतात जैन धर्माचे अनुकरण करणाऱ्या शेकडो जाती असूनही धर्माच्या मुख्य प्रवाहात आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकांना पुरेसे स्थान मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या मते, जैन धर्मातील समता, अहिंसा आणि सर्व जीवांबद्दलची करुणा ही मूल्ये केवळ ग्रंथांपुरती न राहता प्रत्यक्ष समाजकार्यातून दिसणे आवश्यक आहे. सराक समाजासारख्या ऐतिहासिकदृष्ट्या जैन संस्कृतीशी निगडित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाजाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
इतिहासाचा जिवंत ठेवा : ओडिशा आणि झारखंडमधील अनेक भागांत आजही प्राचीन दिगंबर जैन मंदिरांचे अवशेष, शिलालेख आणि मूर्ती आढळतात. त्यामुळे सराक समाजाचा जैन धर्माशी असलेला संबंध हा केवळ श्रद्धेचा विषय नसून ऐतिहासिक आणि सांस्कृतिक अभ्यासाचाही महत्त्वाचा विषय मानला जातो.
धर्म, संस्कृती आणि इतिहास यांचा अद्वितीय संगम असलेला सराक समाज आजही भारताच्या बहुविध परंपरेचा एक जिवंत वारसा म्हणून ओळखला जात आहे. जैन धर्माच्या व्यापक इतिहासाचा शोध घेताना या समाजाच्या योगदानाकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे मत अभ्यासक व्यक्त करीत आहेत.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
