पाथर्डी | राजेंद्र देवढे
पंढरीची वारी हा वर्णनाचा विषय नसून अनुभवाचा विषय आहे. परमपिता परमात्म्याचे पदोपदी अस्तित्व अनुभवायचे असेल तर जीवनात एक वेळा तरी पायी चालत पंढरीची वारी करावी. ईश्वरस्वरूप होऊन ईश्वराचे दर्शन घेत मोक्ष ज्ञानाची प्राप्ती कृतीतून व वारकऱ्यांच्या दिनक्रमातून सहज होते. असे मत भगवान महाराज गर्दे यांनी व्यक्त केले.
जळगाव जिल्ह्यातील सब गव्हाण ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे आज पाथर्डी शहरात दुपारी आगमन झाले. शहरवासीयांनी वाजत गाजत दिंडीचे स्वागत केले. जय भवानी चौकातील लाहोटी परिवाराच्या वतीने आयोजित महाप्रसाद स्थळी त्यांचे प्रवचन झाले. नर्मदा परिक्रमा यात्रा पूर्ण केलेले सेवक रामेश्वर लाहोटी व विजय लाहोटी यांच्या परिवारातर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी शंकर महाराज मठाचे संस्थापक माधवबाबा, भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दादासाहेब मर्दाने, द्वारकादास बंग, अशोक साठे, डॉ. सुरेश मंत्री आदींसह भावीक उपस्थित होते. दिंडीचा आजचा सोळावा दिवस असून दहा जुलै रोजी दिंडी रामचंद्र महाराज यादव मठामध्ये पंढरपूरला पोहोचणार आहे. तेथे कीर्तन सप्ताह संपन्न होईल. दिंडीचे यंदाचे रौप्य महोत्सवी वर्ष असून दिंडी प्रमुख म्हणून नामदेव महाराज पाटील, आप्पासाहेब महाराज बागुल, शेखर महाराज आदी दिंडीचे सर्व व्यवस्थापन व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करतात.
यावेळी पुढे बोलताना गर्दे महाराज म्हणाले, कर्मकांडापेक्षा भक्तीमार्ग श्रेष्ठ असून जात-पात, लिंगभेद विरहित दिंडी सोहळा म्हणजे साक्षात वैकुंठ सुखाची प्राप्ती देणारा ठरतो. मृत्यूनंतर आपल्या सोबत आपण केलेल्या कर्माशिवाय काहीही येत नाही. मृत्यू लोकात म्हणजे पृथ्वीवर सत्कर्म करून स्वर्गामध्ये त्याचे भोग भोगून ईश्वरप्राप्ती करावी असे धर्मशिक्षण सांगते. आपण नेमके याच्या उलट करीत आहोत. भोगलालसा, पाप कर्म, यांच्या गराड्यात गुंतून अशास्त्रीय, अनैतिक कर्म, आपण येथे करतो. त्याची वाईट फळे आपल्याला नरकयातना भोगून भोगावे लागतात. या सर्वांवर मात कशी करायची हे शिकवणारी दिंडी यात्रा असून आषाढी वारी म्हणजे एक एक पाऊल पंढरीच्या दिशेने पडताना एक एक यज्ञाचे पुण्य देणारी आहे, यावरून याचे महत्त्व लक्षात यावे. कलियुगामध्ये कलीचा प्रभाव रोखणारी व त्यापासून मुक्ती देणारी अत्यंत प्रभावी साधना म्हणूनही पायी दिंडी वारीकडे बघितले जाते. दररोज दिवसातून एक वेळा तरी पांडुरंगाचे चिंतन करून वारीला येण्याचे भाग्य आपल्या नशिबात द्यावे, अशी प्रार्थना करावी. भाग्याशिवाय वारी घडत नाही. वारी घडेल तेव्हा घडेल पण वारीच्या दिशेने निघालेल्या वारकऱ्यांची सेवा सुद्धा तेवढीच पुण्यप्रद असल्याचे मत गर्दे महाराज यांनी व्यक्त केले.
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.