क्रीडावार्ता | तुषार सोनवणे
भारतीय संघ जुलै महिन्याच्या शेवटी आणि ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला तीन टी-२० आणि तीन एकदिवसीय सामन्यांसाठी श्रीलंका दौरा करणार आहे. श्रीलंकेच्या पल्लेकेले आणि कोलंबो येथे टी-२० आणि एकदिवसीय सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. मालिकेची सुरवात ता. २७ जुलै रोजी टी-२० सामन्याने होणार असून त्यांनतर एकदिवसीय सामने २ ते ७ ऑगस्ट दरम्यान होतील.
पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम हे टी-२० सामन्याचे यजमानपद भूषवणार आहे तर कोलंबोमधील आर.प्रेमदासा स्टेडियमवर एकदिवसीय सामन्याचे आयोजन असेल. या सामन्यांचे विशेष म्हणजे दोन्ही संघांची त्यांच्या नवीन मुख्य प्रशिक्षकांसह ही पहिलीच मालिका असेल. सनथ जयसूर्या यांची श्रीलंकेच्या मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर गौतम गंभीर हा भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेत असणार आहे. यापुर्वी भारतीय संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड होता. त्याचा कार्यकाळ २०२४ च्या टी-२० विश्वचषकात भारताच्या विजेतेपदासह संपला.
भारताने यापुर्वी जुलै २०२१ मध्ये श्रीलंकेचा दौरा केला होता. त्यावेळी राहुल द्रविड प्रशिक्षक तर शिखर धवन हा भारताचा कर्णधार होता. तेव्हा एकदिवसीय सामन्याची मालिका भारताने २-१ अशा फरकाने जिंकली होती. टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय संघ हा झिम्बाब्वे बरोबर ४-१ अशा फरकाने टी -२० मालिका जिंकला असून श्रीलंकेबरोबर भारताची ही टी-२० विश्वचषकानंतर दुसरी टी-२० मालिका असेल. श्रीलंका टी-२० विश्वचषकात पहिल्या फेरीतून बाद झाला होता त्यांनतर त्यांचे खेळाडू LPL २०२४ मध्ये खेळत होते.
वेळापत्रक
टी-२० – ता. २७, २८, ३० जुलै २०२४.
एकदिवसीय सामने – ता. २, ४, ७ ऑगस्ट २०२४.
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.