भारताचा झिम्बाब्वेवर ४-१ विजय, संजूचे अर्धशतक तर मुकेशच्या चार विकेट

मुंबई | गुरुदत्त वाकदेकर

पाच सामन्यांच्या टी२० मालिकेतील अंतिम सामन्यात भारतीय संघाने झिम्बाब्वेचा ४२ धावांनी पराभव केला. या विजयासह भारतीय संघाने मालिका ४-१ अशी जिंकली आहे. याआधी भारतीय संघाने दुसरा (१०० धावा), तिसरा (२३ धावा) आणि चौथा (१० विकेट) टी२० सामना जिंकला होता. तर पहिल्या सामन्यात झिम्बाब्वेने १३ धावांनी विजय मिळवला होता.

हरारे स्पोर्ट्स क्लब येथे रविवारी झालेल्या पाचव्या टी२० सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ गडी गमावून १६७ धावा केल्या. प्रत्युत्तरात झिम्बाब्वेला १८.३ षटकांत १० गडी गमावून केवळ १२५ धावा करता आल्या. भारताने हा सामना ४२ धावांनी जिंकला. या सामन्यात शिवम दुबेला त्याच्या अष्टपैलू कामगिरीसाठी सामनावीर म्हणून निवडण्यात आले. त्याने २६ धावा केल्या आणि दोन विकेट घेतल्या. तर वॉशिंग्टन सुंदरला प्लेअर ऑफ द सिरीजचा पुरस्कार देण्यात आला. त्याने एकूण २८ धावा केल्या आणि ८ विकेट घेतल्या.

१६८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या झिम्बाब्वेची सुरुवात चांगली झाली नाही. मुकेश कुमारने संघाला पहिला धक्का दिला. एका धावेवर त्याने माधवरेला त्रिफळाचीत बाद केले. तो खाते न उघडताच तंबूमध्ये परतला. यानंतर मुकेशने ब्रायन बेनेटवर निशाणा साधला आणि त्याला शिवम दुबेकडे झेल देण्यास भाग पाडले. त्याला केवळ १० धावा करता आल्या.

यानंतर मारुमणी आणि माईर्स यांनी सामन्याची सूत्रं आपल्या हातात घेतली. दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी ४४ धावांची भागीदारी झाली जी नवव्या षटकात सुंदरने भेदली. त्याने मारुमणीला पायचीत बाद केले. तो २७ धावा करून बाद झाला तर माईर्स ३४ धावा करून तंबूमध्ये परतला. या सामन्यात सिकंदर रझाने आठ धावा, कॅम्पबेलने चार धावा, मदंडेने एक धाव, मावुताने चार धावा केल्या.

भारताविरुद्ध या मालिकेतील पहिला सामना खेळणाऱ्या फराज अक्रमने चमकदार कामगिरी केली. त्याने प्रथम आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. यानंतर त्याने १३ चेंडूत २ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने २७ धावा केल्या. मुकेश कुमारने १९व्या षटकात अक्रमला आपला बळी बनवले. तर नागरवाने शून्य आणि मुझाराबानीने एक धाव (नाबाद) केली.

भारताकडून मुकेश कुमारने एकूण चार विकेट घेतल्या. त्याने माधवरे, बेनेट, अक्रम आणि नागरवा यांना बाद केले. याशिवाय शिवम दुबेने २ तर तुषार, सुंदर आणि अभिषेकने प्रत्येकी एक विकेट घेतली.

या सामन्यात भारताची सुरुवात चांगली झाली होती. डावाच्या पहिल्याच चेंडूवर यशस्वी जैस्वालने १३ धावा केल्या. वास्तविक, सिकंदर रझाने पहिल्याच चेंडूवर नो बॉल टाकला होता ज्यावर जयस्वालने षटकार मारला होता. यानंतर फ्री हिटचा फायदा घेत त्याने आणखी एक षटकार मारला. मात्र, या षटकातील चौथ्या चेंडूवर रझाने त्याला बाद केले. यानंतर अभिषेक शर्मा फलंदाजीला आला त्याला केवळ १४ धावा करता आल्या. पॉवरप्लेमध्ये भारताने तीन विकेट गमावल्या. कॅप्टन गिलची बॅटही आज शांत राहिली. त्याला केवळ १३ धावा करता आल्या.

यानंतर संजू सॅमसन आणि रियान पराग यांनी पदभार स्वीकारला. चौथ्या विकेटसाठी दोघांमध्ये ६५ धावांची भागीदारी झाली. मावुताने पंधराव्या षटकात परागला आपला बळी बनवले. २२ धावा करून तो बाद झाला. तर संजू सॅमसन ५८ धावांची तुफानी खेळी करून तंबूमध्ये परतला. त्याने ३९ चेंडूत आपल्या टी२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील दुसरे अर्धशतक झळकावले. यष्टिरक्षक फलंदाजाने आपल्या खेळीदरम्यान एक चौकार आणि ४ षटकार मारले. या सामन्यात शिवम दुबेने २६ धावा केल्या. रिंकू ११ धावा करून नाबाद राहिला आणि सुंदर एक धाव घेत नाबाद राहिला. झिम्बाब्वेकडून मुझाराबानीने दोन तर रझा रिचर्ड आणि मावुता यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *