पारनेर | प्रतिनिधी
शेतकऱ्यांकडून फक्त एक रुपया मात्र शासनाकडून लाखो रुपये उकळणाऱ्या पिक विमा कंपन्या हजारो कोटी रुपये गोळा करतात व विमा देताना चलाखी करुन हात वर करतात, अशी भूमिका ॲड. कॉ. बन्सी सातपुते यांनी किसानसभेच्या बैठकीत मांडली. याप्रसंगी बोलताना कॉ. सातपुते म्हणाले की, पिक विमा भरुन विमा मिळत नाही म्हणून शेतकरी विमा उतरविण्यास उत्सुक नव्हते म्हणून शेतकऱ्यांना आकर्षित करण्यासाठी एक रुपयात विमा ही योजना आणली. शासन यात हजारो कोटी प्रिमियम पोटी भरते. मागील वर्षी खरीपाच्या जोखीम रकमेच्या फक्त ६.२१% तर रब्बी हंगामात ०.२१% भरपाई देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली व दहा हजार कोटींची लुट विमा कंपन्यांनी केली.
ते पुढे म्हणाले, २०२३ मध्ये नापिकीला कंटाळून २१८३ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली, आत्महत्या केल्या. याला सर्वस्वी विमा कंपन्यांची नफेखोरी जबाबदार आहे. दुध पावडरची आयात, कांद्यावरील निर्यात शुल्कामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.
यावेळी किसानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष बबन पाटील सालके, सचिव अप्पासाहेब वाबळे व सहसचिव हरिभाऊ गायकवाड यांचा भाकप राज्य सचिव मंडळ सदस्या कॉ. स्मिता गोविंद पानसरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. किसान सभेच्या वतीने दुधाला हमी भाव, शेतीमालाला किमान आधारभूत किंमत, पिक विमा प्रश्नी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
बैठकीस कैलास शेळके, बबन रावडे, चंद्रकांत चौधरी, भाऊसाहेब भगत, विजय थोरात, दादाभाऊ शिंदे, फिरोज शेख, शिवाजी करंजुले, बापू दिवटे, भागवत गायकवाड, कारभारी आहेर, संपत रावडे, अशोक गायकवाड, सुरेश होले, सुलाबाई आदमाने आदींसह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्ताविक संतोष खोडदे यांनी तर आभार अंकुश गायकवाड यांनी मानले.
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.