श्रीरामपूर (प्रतिनिधी) १२.६.२४
समाजकारणासह राजकारणात आपल्या विचारांवर, नेत्यांवर मनापासून प्रेम करणारे कार्यकर्ते असतात. निवडणूकीत आपल्या विचार, नेता निवडून यावा, पुढे जावा म्हणून ते सतत मग्न असतात. आपल्या विचारांसाठी ते हे कार्य करतात. असाच अनुभव शिर्डी लोकसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते यांना आला.
असेच एक युवा कार्यकर्ता नेतृत्व म्हणजे महेंद्र थोरात. श्रीरामपूरमधील पढेगाव येथील असलेले महेंद्र हे स्वतः सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. वंचित बहुजन आघाडीकडून रूपवते उमेदवारी जाहीर होताच त्यांनी निकाल लागेस्तोवर ‘अनवाणी’ राहण्याचा म्हणजेच पायात चप्पल न घालण्याचे व्रत घेतले व ते निभावले.
या विषयी माहिती देताना रूपवते म्हणाल्या की, लोकसभेची निवडणूक लढवत असताना उमेदवार म्हणून अनेक ठिकाणी भावुक व आयुष्यामध्ये कायमचे लक्षात राहतील असे क्षण मी अनुभवले! आपण सर्व विज्ञानवादी व कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा न बाळगणारे लोकं पण या युवा कार्यकर्त्याचे समर्पण मला नक्कीच भावलं. माझी वैयक्तिक ओळख नाही, कधी भेट नाही, वैयक्तिक आयुष्यात माझ्या कुठल्याही कृतीमुळे त्यांना कधी फायदा झाला असेही नाही. एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून महेंद्र दादांनी अनेक दिवस अनवाणीच गावोगावी इतर कार्यकर्त्यांसोबत प्रचार केला. पायाला अनेकदा इजा झाली पण दादा मागे हटले नाही. निकाल अपेक्षित लागला नाही परंतु तरीसुद्धा, “ताई, आम्ही सदैव तुमच्या सोबत” असे सांगण्यास ते विसरले नाहीत.
त्या पुढे म्हणाल्या, परवा श्रीरामपूर येथे असताना मा. महेंद्र दादांना नवीन चप्पल घेतली. त्या क्षणी मनाला झालेला आनंद काही वेगळाच होता. असे जिवाभावाचे कार्यकर्ते सहकारी मिळणं खरंच मोठी गोष्ट आहे!
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.