नाशिक शिक्षक मतदारसंघात किशोर दराडे विजयी

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी व्दिवार्षिक निवडणुकीत शिवसेनेचे किशोर दराडे यांना तपशीलवार मतमोजणीअंती २६ हजार ४७६ मते मिळाली होती. जिंकून येण्यासाठी ३१ हजार ५७६ इतक्या मतांचा निश्चित केलेला कोटा १९ व्या वगळणीफेरी अखेर उमेदवार किशोर दराडे यांनी पूर्ण करून सर्वाधिक पसंतीक्रमाची ३२ हजार ३०९ मतांनी नाशिक शिक्षक मतदार संघातून निवडून आले, असे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी जाहीर केले.

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी व्दिवार्षिक निवडणुकीची मतमोजणी अंबड येथील केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामात शांततेत पार पडली. मतमोजणीसाठी एकूण ३० टेबल ठेवण्यात आले होते. या निवडणुकीत एकूण ६४ हजार ८५३ मतदारांनी मतदान केले होते. त्यापैकी  ६३ हजार १५१ मते वैध ठरली तर १ हजार ७०२ मते अवैध ठरली.  जिंकून येण्यासाठी   ३१ हजार ५७६  इतक्या मतांचा निश्चित कोटा ठेवण्यात आला होता.

कोटा निश्चित झाल्यानंतर बाद फेऱ्यांचे मतमोजणी सुरू झाली. यामध्ये १९ व्या बाद फेरीनंतर संदीप गुळवे पाटील हे बाद झाले असून अंतिम लढत किशोर दराडे व विवेक कोल्हे या दोन उमेदवारामध्ये झाली. यामध्ये जिंकून येण्यासाठी   ३१ हजार ५७६  इतक्या मतांचा कोटा निश्चित केला होता. १९ व्या फेरी अखेर बाद झालेल्या उमेदवारांची मते पसंती क्रमानुसार संबंधित उमेदवारांना देण्यात आली. दराडे यांनी कोटा पूर्ण करून सर्वाधिक पसंतीक्रमाची ५ हजार ६० मते मिळवून विजयी झाले. विवेक कोल्हे यांना तिसऱ्या फेरीअखेर १७ हजार ३९३ मते पडली असून सर्वाधिक पसंती क्रमाची ६ हजार ७२ मते मिळाली.

मतमोजणी पूर्ण होऊन अहवाल भारत निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आला. आयोगाच्या परवानगीने डॉ.गेडाम यांनी किशोर दराडे यांना विजयी उमेदवार म्हणून घोषित केले तसेच त्यांना विजयी उमेदवाराचे प्रमाणपत्र प्रदान केले.

यावेळी निवडणूक निरीक्षक विक्रम कुमार,  नाशिक जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हाधिकारी अहमदनगर सिद्धराम सालीमठ, जिल्हाधिकारी धुळे अभिनव गोयल, जिल्हाधिकारी जळगाव आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी नंदूरबार मनीषा खत्री, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर आयुक्त निलेश सागर, यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, मतमोजणी पर्यवेक्षक, सहपर्यवेक्षक उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *