देवशयनी आषाढी एकादशी निमित्त ‘हेचि दान दे गा देवा’; सांस्कृतिक कार्य विभागाचा आध्यात्मिक सांस्कृतिक कार्यक्रम

मुंबई | गुरुदत्त वाकदेकर

आषाढी एकादशीला`देवशयनी एकादशी’ म्हणण्याचे कारण म्हणजे मनुष्याचे एक वर्ष हे देवांचे एक अहोरात्र असते. दक्षिणायन ही देवांची रात्र असून उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो. आषाढ महिन्यात येणार्‍या कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होते, म्हणजेच देवांची रात्र सुरू होते; म्हणून आषाढी एकादशीला `देवशयनी’ (देवांच्या निद्रेची) एकादशी’, असे म्हणतात. देवांच्या या निद्राकालात असुर प्रबळ होतात आणि मानवाला त्रास देऊ लागतात. त्या असुरांपासून (आसुरी शक्तींपासून) स्वत:चे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी व्रत (साधना) करणे आवश्यक असते. या आषाढी एकादशीचे महत्त्व खुप मोठे असून या एकादशी व्रताने सर्व पापांचा नाश होतो, अशी वारकर्‍यांची भावना असल्याने एकादशीच्या दिवसाला वारकर्‍यांच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे. हाच आध्यात्मिक धागा पकडून महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य विभागाने “हेचि दान दे गा देवा” हा आध्यात्मिक सांस्कृतिक कार्यक्रम ता. १६ जुलै, २०२४ रोजी सायंकाळी ६:३० वाजता सोलापूर येथील हुतात्मा स्मृती मंदिर येथे विनामूल्य आयोजित केला आहे.

कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहर, तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री तथा पालकमंत्री, सोलापूर जिल्हा चंद्रकांत (दादा) पाटील हे हजर राहाणार आहेत. तसेच माननीय खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, धैर्यशिल मोहिते-पाटील, कु. प्रणिती शिंदे, यांच्यासोबत आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, सुभाष देशमुख, शहाजी पाटील, यशवंत माने, राम सातपुते, अरुण लाड, बबनराव शिंदे, राजेंद्र राऊत, समाधान आवताडे, जयंत आसगांवकर, विजय देशमुख, संजयमामा शिंदे, सचिन कल्याणशेट्टी आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहाणार आहेत.

“हेचि दान दे गा देवा” ह्या अध्यात्मिक सांस्कृतिक कार्यक्रमात ज्येष्ठ गायिका बकुळ पंडित, पंडित कल्याणजी गायकवाड, प्राजक्ता काकतकर-देशक, भारुडकार कृष्णाई उळेकर यांचा सहभाग असणार आहे. कार्यक्रमाचं निवेदन प्राची गडकरी करणार अाहेत. सदर कार्यक्रमासाठी रसिक प्रेक्षकांना विनामूल्य प्रवेश देण्यात येणार आहे, असे मा. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा प्रधान सचिव सांस्कृतिक कार्य विभाग विकास खारगे तसेच सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांनी कळविले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *