उत्कर्षा रूपवते यांचा राधाकृष्ण विखेंवर हल्लाबोल; उपोषणकर्त्या शेतकऱ्यांची घेतली भेट

अहमदनगर | प्रबुध्द भारत

दुधाला मिळणाऱ्या दरावरून दुध उत्पादकांमध्ये नाराजी आहे. दुध उत्पादक शेतकरी आक्रमक होऊ लागला असून राज्यात ठिकठिकाणी दुध दरवाढीबाबत आंदोलने सुरू आहेत. यावरून आता वंचितच्या प्रवक्त्या उत्कर्षा रूपवते यांनी दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

कष्टकरी शेतकऱ्यांच्या दुधाला चाळीस रुपये हमीभाव मिळावा, दुग्धविकास मंत्र्यांनी केवळ आश्वासन न देता आता दूध दराबाबत अंमलबजावणी करावी, अशी मागणी रूपवते यांनी केली आहे.

दुधाच्या दराला हमीभाव मिळावा या मागणीसाठी अकोले तालुक्यातील गणोरे येथे शेतकऱ्याकडून बेमुदत आमरण उपोषण सुरू आहे. उपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांची तब्येती खालवली असून प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही आहे. मात्र, उपोषणकर्त्या शेतकऱ्यांची उत्कर्षा रूपवते यांनी भेट घेतली. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत रूपवते यांनी सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी बोलतांना रूपवते म्हणाल्या की, दुधाचा प्रश्न हा सध्या महाराष्ट्रात पेटलेला आहे. ज्यावेळी शेती ही संकटात असते, त्यावेळी दूधच शेतकऱ्याला तारून नेते. मात्र दुधाला योग्य दर न मिळाल्याने शेतकरी हतबल झाला आहे, असं त्या म्हणाल्या.

नुकताच शासनाने एक जीआर काढला असून यामध्ये तीस रुपये हमीभाव व पाच रुपये अनुदान दिले आहे. मात्र शासन निर्णय निघण्यापूर्वीच पशुखाद्याचे दर सरकारने वाढवले. एका हातने सरकार म्हणून आम्ही दुध उत्पादक शेतकऱ्यांना मतद करतोय, असं दाखवायचं, तर दुसरीकडे पशुखाद्याची भाववाढ करून शेतकऱ्यांना लुटायचा हाच सरकारचा प्रयत्न असल्याची टीका रुपवते यांनी केली.

    गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांचे उपोषण चालू आहे. मात्र याची दखल प्रशासनाकडून घेतली जात नाही आहे. तसेच राज्याचे दुग्धविकास मंत्री हे नगर जिल्ह्यातील असून राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. कष्टकरी शेतकऱ्यांचे हक्काची मागणी असून किमान दुधाला ४० रुपये हमीभाव मिळावा, अशी मागणीही यावेळी रुपवते यांनी केली, अशी माहिती प्रबुध्द भारत यांनी दिली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *