कर्जत जामखेड (रिजवान शेख, जवळा) २०.६.२०२४
कर्जत-जामखेड मतदारसंघात आमदार रोहित पवार यांनी गेल्या पाच वर्षात जलसंधारणाच्या केलेल्या विविध कामांचा परिणाम आता दिसू लागला असून पहिल्याच पावसात नदी खोलीकरण, बंधारे खोलीकरण, ओढे रुंदीकरण, पाझर तलावातील गाळ काढणे अशा विविध कामांमुळे नदीवरी बांधारे, ओढे-नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. जामखेड तालुक्यात झालेल्या पावसामुळे नांदणी नदीवरील ३४ बंधारे ओव्हरफ्लो झाले आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना शेतीपिकांसाठी याचा मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण आहे.
आमदार रोहित पवार यांनी ही कामे करण्यापूर्वी चांगला पाऊस होऊनही विहीरीची पाणीपातळी वाढत नसे. कारण जमिनीत पाणीच अडवले जात नसल्यामुळे पाणी पातळी उंचावत नव्हती म्हणून विहीर, बोरवेलला पाणी येत नव्हते. आमदार पवार यांनी ही कामे केल्यापासून पहिल्याच पावसात विहिरीच्या पाणीपातळीत विक्रमी वाढ झाली. नान्नज सर्कलमध्ये रोहित पवार यांनी स्वःखर्चातून तसेच शासकीय निधी, कर्जत-जामखेड एकात्मिक संस्था, सकाळ रिलिफ फंड, नाम फाऊंडेशन, भारत फोर्स आदी संस्थेच्या माध्यमातून नांदणी नदी, मांजरा नदीवरील बंधाऱ्यांचं खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आलं तसेच या भागातील नाल्या-ओढ्यात साचलेला गाळ, वाळू, मुरूम काढून टाकण्यात आला. त्याचा परिणाम या परिसरात चांगला पाऊस झाल्यामुळे नदीवरी बंधारे, ओढे, नाले, लहान-मोठे तलाव ओसंडून वाहत आहेत. विहीरीच्या पाणीपातळीतही झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे नान्नज, बोर्ले आणि जवळा या भागातील पिण्याचा तसेच शेतीसाठी पिकांना लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे, तसेच जनावरांचाही चाऱ्याचा प्रश्न सुटणार आहे. जलसंधारणाची कामे केल्यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास देखील मदत झाली तसेच जमिनीच्या भूजलपातळीत देखील वाढ झालीय त्यामुळे बळीराजा सुखावला आहे.
गेल्या काही वर्षात जलसंधारणाची कामे झाल्यामुळे यावेळी पाण्याचे टँकरदेखील कमी लागले. तरीदेखील ज्या गावांना पाण्याची समस्या निर्माण झाली तिथे आ. पवार यांनी कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्था आणि बारामती ॲग्रो’च्या माध्यमातून पाण्याचे टँकर दिले आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
शेतीसाठीचं पाणी ही कर्जत जामखेड मतदारसंघाची मुळ समस्या आहे. ही समस्या सोडवण्यासाठी गेल्या पाच वर्षापासून मी काम करत आहे. या कामासाठी वेगवेगळ्या माध्यमातून निधी आणला आणि अनेक कामे मार्गी लावली. त्याचेच हे नयनरम्य दृश्य आज मला दिसतेय. हे काम बघून माझ्यासाठी या कामाचे सार्थक झाले असे मी समजतो, असे आ. रोहित पवार म्हणाले.
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.