पिंपरी | प्रदीप गांधलीकर
१९४७ मध्ये देशाची लोकसंख्या ३५ कोटी होती. आता ती १३५ कोटींचा आकडा कधीच ओलांडून गेली. तरी सरकारला त्याबाबत अजिबात गांभीर्य नाही. या पार्श्वभूमीवर सुजाण नागरिकत्व ही काळाची गरज मानून लोकसंख्या नियंत्रण केले पाहिजे, अन्यथा लोकसंख्येचा विस्फोट होऊन अराजक माजेल, असे विचार ज्येष्ठ समीक्षक, विचारवंत प्रा.डॉ.श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पिंपरी – चिंचवड विभागाच्या वतीने जागतिक लोकसंख्यादिनानिमित्त एका अपत्यावर संतती प्रतिबंधक शस्त्रक्रिया करून घेणार्या व्यक्तींचा प्रातिनिधिक सत्कार करताना प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस बोलत होते.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते महेंद्र भारती आणि सामाजिक कार्यकर्त्या सुप्रिया सोळांकुरे यांना याप्रसंगी सन्मानित करण्यात आले. ज्येष्ठ विधिज्ञ ॲड.गोपाळ गुणाले, प्रा.प्रभाकर दाभाडे, कवयित्री ललिता सबनीस, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, पिंपरी – चिंचवड विभागाध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रा.डॉ.श्रीपाल सबनीस पुढे म्हणाले की, अनियंत्रित आणि भरमसाठ लोकसंख्यावाढीने निवारा, शिक्षण, रोजगार, पर्यावरण या मूलभूत सुविधांसह दिवसेंदिवस अनेक गंभीर समस्या निर्माण होत आहेत; परंतु शासन याबाबत कुचकामी ठरले आहे. त्यामुळे सुजाण नागरिकांनी जात, धर्म, पंथ असे भेदाभेद न करता लोकसंख्या नियंत्रणाच्या दृष्टीने साक्षर झाले पाहिजे. अन्यथा लोकसंख्येचा विस्फोट होऊन देशांचे नकाशे बाद होऊन सर्वत्र अराजक माजेल. माणूसच माणसाचा वंश नष्ट करू पाहतो आहे. यामुळे आपण सहजीवन, सहअस्तित्व अंगीकारून भावी पिढीला सुखी, समाधानी आणि आनंदी जीवनासाठी आश्वस्त केले पाहिजे. महेंद्र भारती आणि सुप्रिया सोळांकुरे यांनी सत्काराप्रित्यर्थ कृतज्ञता व्यक्त केली. प्रभाकर वाघोले यांनी प्रास्ताविक केले. अरुण गराडे यांनी सूत्रसंचालन केले. जयवंत भोसले यांनी आभार मानले.
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.