गोवा | ५ मार्च | प्रतिनिधी
(World news) पेरू-दक्षिण अमेरिकास्थित हिस्पँनिक वर्ल्ड रायटर्स युनियन (यूएचई) या जागतिक साहित्यिक संघटनेने जगाच्या पाचही खंडांमधून निवडलेल्या सत्तर प्रभावशाली कवींमधे भारतातून महाकवी सुधाकर गायधनी यांची नुकतीच निवड केली. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा पेरू देशाचे राष्ट्रीय कवी कार्लोस चालेन यांच्या मार्फत टर्कीश यूएचई प्रमुख कवयित्री प्रिन्सेस टर्केन इर्गोर यांनी सुधाकर गायधनी यांना तसे कळवून त्यांचे अभिनंदन केले.
(World news) महाकवी गायधनी यांचे विश्वसाहित्यात चर्चेत असलेले ‘समग्र देवदूत’ अर्थात महावाक्य या महाकाव्याचे इंग्रजीसह स्पँनिश, रोमानियन, चायनीज, इटालियन, रशियन, मँसेडोनियन आदी भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. त्यांच्या शतकोत्तर स्फुट कविताही आजवर जगातील ३५ भाषांमध्ये अनुवादित झाल्या आहेत. रोमानियन भाषेतील ‘कान्टँक्ट इंटरनँशनल’ मासिकाचे मुख्य संपादक, जगविख्यात कवी प्रा.डॉ. लिवियू पेन्डेफुण्डा यांनी संपूर्ण देवदूत रोमानियन भाषेत अनुवादित करून सांस्कृतिक नगरी मिरोस्लावा येथे आयोजित एका विशेष समारंभात लोकार्पित करताना महाकवी सुधाकर गायधनींचे हे महाकाव्य साहित्यातील नोबेल पुरस्काराच्या योग्यतेचे असल्याचे जाहीर केले. तसेच देवदूत खंड एक स्पेन देशातील प्रसिद्ध कवयित्री अनाबेल क्लेनी यांनी स्पँनिशमधे अनुवादित करून प्रकाशित केले असून अँमँझानवर विक्रीला आहे. हाच खंड हिंदीत महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीच्या सौजन्याने दिल्ली येथून प्रकाशित झाला. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात दोन अभ्यासकांनी गायधनींच्या समग्र कवितेवर पीएचडी केली आहे.
(World news) काव्यक्षेत्रातील अमेरिका स्थित ‘वर्ल्ड अकादमी आँफ आर्ट अँड कल्चर’ या युनोस्को मान्यताप्राप्त संस्थेने त्यांना मानद डॉक्टरेटने सन्मानित केले आहे. इंडोनेशियाच्या इम्पिरीयल राँयल हाऊसने त्यांना ‘आँनररी टायटल आँफ नाईट्स’ या किताबाने सन्मानित केले आहे.
बिरलँड देशाने त्यांच्यावर एक पौंडचा पोस्टल स्टँम्प काढला असून नागपूरजवळील खापा या त्यांच्या जन्मगावी खापा नगरपालिकेने त्यांच्या नावे अडीच एकर जागेत महाकवी सुधाकर गायधनी उद्यान निर्माण केले आहे. त्यांचे देवदूत हे काव्य मराठी आणि इंग्रजीत प्रसिद्ध कवयित्री डॉ. मंजूषा सावरकर यांच्या आंतरराष्ट्रीय कुसुमाई प्रकाशनाने प्रकाशित केले तसेच डॉ. ओम बियाणी, विश्वास वैद्य आणि डॉ. दत्ता सावंत यांनी त्याचे इंग्रजीत रुपांतर केले आहे. त्यांच्या ‘कबरीतला समाधिस्थ’ या कविता संग्रहाचा इंग्रजीत अनुवाद महर्षी कर्वे यांच्या कुटुंबातील नामवंत लेखिका गौरी देशपांडे आणि नागपूरचे आनंद जोग यांनी केला आहे. साहित्यातील नोबेल पुरस्काराने सन्मानित कँनेडियन लेखिका अँलिक मुनरो यांच्या कथासाहित्याच्या चायनीज अनुवादिका चीन येथील जगप्रसिद्ध कवयित्री यंग युजन असून यांनीच ‘देवदूत द एन्जल’ या महाकाव्याचाही चीनी भाषेत अनुवाद केला आहे. त्यांनी घेतलेली गायधनी यांची सविस्तर मुलाखत चीन येथील बहुचर्चित साहित्यिक नियतकालिकात लवकरच प्रकाशित होत आहे, अशी माहिती प्रभाकर ढगे यांनी दिली.
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.