नवी दिल्ली |२१.१ | रयत समाचार
जागतिक बाजारातील अनिश्चितता, परकीय गुंतवणुकीच्या निर्गमनाचा वाढता वेग आणि तीव्र होत चाललेले भू-राजकीय तणाव यांचा थेट परिणाम भारतीय चलनावर झाला आहे. रुपया डॉलरच्या तुलनेत ९१.६४ या ऐतिहासिक नीचांकी पातळीवर पोहोचला आहे.
जानेवारी महिन्यातच रुपयामध्ये सुमारे १.५ टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली असून, यामुळे आयात खर्च वाढण्याची तसेच महागाईवर दबाव येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परकीय गुंतवणूकदारांनी शेअर व बाँड बाजारातून निधी काढून घेतल्याने चलन बाजारात अस्थिरता वाढली आहे.
तज्ज्ञांच्या मते, जागतिक पातळीवरील आर्थिक संकेत, मध्यवर्ती बँकांची धोरणे आणि भू-राजकीय घडामोडी याकडे आगामी काळात बारकाईने लक्ष ठेवावे लागणार आहे. रुपयाची ही घसरण निर्यातदारांसाठी काही प्रमाणात दिलासादायक असली, तरी सर्वसामान्यांवर महागाईचा भार वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
