मुंबई | २८ जून | प्रतिनिधी
(Women) एकल महिलांच्या विविध समस्यांबाबत संवेदनशीलतेने आणि गांभीर्याने विचार व्हावा, या हेतूने विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज विशेष बैठक घेतली. सुट्टीचा दिवस आणि अधिवेशनपूर्व तयारीची गडबड असतानाही त्यांनी विधानपरिषद कार्यालयात ही बैठक घेतल्याने विशेषतः महिलांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
(Women) बैठकीस सामान्य प्रशासन विभागाच्या अप्पर सचिव व्ही. राधा, सचिव विमला, महिला व बालकल्याण विभागाच्या आयुक्त नयना गुंडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. राज्यातील एकल महिलांचे सर्वेक्षण करण्याच्या शक्यतांवर या बैठकीत चर्चा झाली. एकल महिलांना रोजगाराच्या संधी, त्यांच्यासमोरील सामाजिक व आर्थिक अडचणी, तसेच विविध विभागांद्वारे राबविण्यात येणाऱ्या योजनांचा एकत्रित आढावा यावरही सखोल चर्चा करण्यात आली.
(Women) या बैठकीत ‘साऊ एकल महिला समिती’चे अभ्यासू कार्यकर्ते मिलिंदकुमार साळवे, जिल्हा समन्वयक अशोक कुटे, विद्या गडाख यांची उपस्थिती होती. या चर्चेमुळे एकल महिलांचा मुद्दा मंत्रालयाच्या पातळीवर अधिक प्रभावीपणे मांडला जाणार असल्याचा विश्वास हेरंब कुलकर्णी यांनी व्यक्त केला.
“एकल महिलांसाठी विविध विभागांना एकत्र आणून समन्वय साधणे हे मोठे आणि गरजेचे काम आज नीलमताईंनी केलं आहे,” असेही कुलकर्णी म्हणाले. एक तासाहून अधिक वेळ चाललेल्या या बैठकीमुळे प्रशासनातील पुढील निर्णयप्रक्रियेस दिशा मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
हे ही वाचा : Social | सामाजिक संघर्ष कमी करण्याचे ‘भिवंडी मॉडेल’; ‘खोपडे पॅटर्न’ : एक भारतीय प्रयोग, जागतिक मान्यता
