अहमदनगर | १५.३ | रयत समाचार
(Women) येथील जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली भरोसा सेलच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनमधील पोलीस दीदींसाठी स्नेहालयच्या सहकार्याने विशेष ‘पोलीसदीदी प्रशिक्षण कार्यशाळा’ आयोजित करण्यात आली. शाळा व महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षा आणि संरक्षणासाठी ‘पोलीसदीदी’ ही संकल्पना अधिक प्रभावीपणे राबविणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता.
(Women) जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये तसेच सार्वजनिक ठिकाणी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीसदीदी संकल्पना राबविली जात आहे. या पार्श्वभूमीवर पोलीसदीदींच्या कामाचे स्वरूप, विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची पद्धत, शाळा- महाविद्यालयांमध्ये राबविण्यात येणारे उपक्रम, तसेच अल्पवयीन मुला-मुलींशी संबंधित समस्यांबाबत जागरूकता आणि संवेदनशीलता वाढविणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यासोबतच पोलिस आणि सामाजिक संस्थांमधील समन्वय वाढवून ही संकल्पना अधिक परिणामकारक करण्यावर भर देण्यात आला.
(Women) प्रशिक्षणादरम्यान विविध तज्ज्ञांची मार्गदर्शनपर सत्रे आयोजित करण्यात आली. ॲड. श्याम आसावा यांनी पोलीसदीदी संकल्पना व कायदेशीर जबाबदाऱ्या, डॉ. विनय कोपरकर यांनी संवाद कौशल्य, डॉ. प्राजक्ता कुलकर्णी यांनी अल्पवयीन मुलांची मानसिक व भावनिक स्थिती, तर डॉ. तेजस्विनी मिस्कीन यांनी पीडित मुलामुलींचे आरोग्य निदान व उपचार या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यामुळे हे प्रशिक्षण माहितीपूर्ण व प्रभावी ठरले.
यावेळी जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांनी आपल्या परिसरात पोलीसदीदींची उपस्थिती सुनिश्चित करणे तसेच पालकांनीही विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पुढाकार घेण्याची गरज व्यक्त करण्यात आली. सर्वांच्या सहभागातून सुरक्षित आणि सहाय्यक समाज निर्माण करण्याचा संदेश या कार्यशाळेतून देण्यात आला.
कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाच्या मुख्याधिकारी संध्या गायकवाड तसेच स्नेहालयचे डॉ. गिरीश कुलकर्णी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन भरोसा सेलच्या पोलीस उपनिरीक्षक प्रियंका आठरे यांनी केले.


