अहमदनगर | १३ मे २०२५ | प्रतिनिधी
(Social) माणुसकीची शाळा आणि सावली प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने केडगाव येथे प्रथमच आयोजित केलेल्या निवासी बालसंस्कार शिबिराचे उद्घाटन झाले. हे शिबिर बालमनाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आणि संस्कारमूल्ये रुजविण्यासाठी महत्त्वाचे पाऊल आहे, असे दैनिक लोकमतचे निवासी संपादक सुधीर लंके यांनी सांगितले. “शिबिरात शिकलेली संस्कारमूल्ये दैनंदिन जीवनात आणि अभ्यासात उपयोगी पडतील. आत्मविश्वास, इच्छाशक्ती, सकारात्मक दृष्टीकोन आणि क्रियाशीलता यशाचा पाया ठरेल. हा संस्काराचा ठेवा जतन करावा,” असे आवाहन त्यांनी केले. राष्ट्र सेवा दलाचे माजी जिल्हा संघटक बापू जोशी यांनी पालकांना उद्देशून सांगितले, “मुलांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन त्यांना आनंदी आणि समाधानी ठेवण्यासाठी पालकांनी सक्रिय सहभाग घ्यावा. ”
(Social) शिबिराची सुरुवात सानेगुरुजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण आणि ‘खरा तो एकची धर्म’ या प्रार्थनेने झाली. शिबिरप्रमुख शिवाजी नाईकवाडी यांनी ता. ३ ते १२ मे या कालावधीत झालेल्या उपक्रमांची माहिती दिली. शिबिरात मनोरंजनासह संस्कारक्षम शिक्षण, व्यवहारज्ञान, देशभक्तीपर गीते, श्रमाची प्रतिष्ठा सांगणारी गाणी, अंधश्रद्धा निर्मूलन आणि स्फूर्ती गीते यांचा समावेश होता. याशिवाय स्मरणशक्तीचे खेळ, सूर्यनमस्कार, योगासने, हस्तकला, व्यक्तिमत्व विकास, कथामाला, प्रतिज्ञा, संविधान प्रास्ताविकेचे अभिवाचन आणि पथनाट्य प्रशिक्षण यांचाही समावेश होता. विनायक सापा यांनी अंधश्रद्धा निर्मूलनावरील कार्यशाळा घेतली.
(Social) शिबिरार्थींनी “माणसाने माणसाशी माणसासम वागणे” ही सामुदायिक प्रार्थना म्हणत आपले मनोगत व्यक्त केले. अनघा राऊत यांनी सूर्यनमस्कार आणि योगासने शिकवली, तर शिबिरार्थींनी ‘स्वर्गात आकाशगंगा’ या गीतावर लयबद्ध नृत्य सादर केले. पालकांनी शिबिराच्या आयोजनाबद्दल संयोजन समितीचे कौतुक केले आणि भविष्यात अशा उपक्रमांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
शिबिर यशस्वी करण्यासाठी पूनम मुथा, नितेश बनसोडे, प्रा. उमादेवी राऊत, रवी राऊत, उषा नाईकवाडी आणि अश्विनी नाईकवाडी यांनी विशेष परिश्रम घेतले. शिबिरप्रमुख शिवाजी नाईकवाडी यांनी आभार मानले.
हे ही पहा : History | आचार्य प्र.के.अत्रे दिग्दर्शित ‘महात्मा फुले’ चित्रपट पहाण्यासाठी लिंक
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.