अहमदनगर | १४ एप्रिल | प्रतिनिधी
(Social) देशातील प्रत्येक नागरिकाला सन्मानपूर्वक जगण्याचा अधिकार डॉ. आंबेडकर यांनी घटनेच्या माध्यमातून दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तत्वज्ञान हे अतिशय सहज आणि सोपे होते. समाजातील प्रत्येकाला आदरपूर्वक वागणूक मिळावी. कुठल्याही निकषावर भेदभाव करू नये. स्वातंत्र्यानंतर देशामध्ये सुराज्याची स्थापना आदर्श घटनेमुळेच होऊ शकली. त्यातूनच आपला देश एकसंघ राहिला असल्याचे प्रतिपादन डॉ. सुरेश पठारे यांनी केले.
(Social) सीएसआरडी समाजकार्य महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती तसेच सामाजिक समता सप्ताहाच्या समारोपानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ.पठारे बोलत होते. मंचावर पोलीस उपअधीक्षक अमोल भरती, सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त प्रवीण कोरगंटीवार, जिल्हा परिषदेचे जिल्हा समाजकल्याण अधिकारी देविदास कोकाटे, महाविद्यालयाचे संचालक डॉ. सुरेश पठारे, समाजकल्याण निरीक्षक संगीता चितळे आदी उपस्थित होते.
(Social) सर्वप्रथम महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सहायक आयुक्त प्रवीण कोरगंटीवार यांनी समता सप्ताहामध्ये राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकला.
अमोल भारती म्हणाले, देशातील प्रत्येक व्यक्तीला शिकण्याचा, जगण्याचा अधिकार तसेच आपल्या अधिकारासाठी लढण्याची प्रेरणा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातूनच मिळाली. समाजातील दुर्बल घटकांसह प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच मिळाला असून त्यांचे विचार आपल्या सर्वांसाठी आजही प्रेरणादायी असल्याचे ते म्हणाले.
देविदास कोकाटे म्हणाले, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या सर्व बाबी एकाच घटनेच्या माध्यमातून आपल्याला मिळाल्या आहेत. घटनेचे रक्षण करण्याबरोबरच स्वतःबरोबर दुसऱ्याच्या हक्कासाठी समाजातील प्रत्येकाने जागरूक असणे गरजेचे आहे. आपला विकास साधावयाचा असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या शिक्षणाच्या संदेशाचे अनुकरण प्रत्येकाने करण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे केवळ भारताच्या संविधानाचे शिल्पकार नव्हते तर ते सामाजिक क्रांतीचे प्रणेते होते. त्यांचे विचार आणि जीवनमूल्ये आजही समाजाला दिशा देणारे ठरतात. बाबासाहेबांचे विचार आणि जीवनमूल्ये जाणून घेत ती जीवनात आचारणात आणण्याचा प्रत्येकाने संकल्प करण्याची गरज असल्याचा सूर सीएसआरडी समाजकार्य महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमातून निघाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सॅम्युअल वाघमारे यांनी केले. सकाळी अहमदनगर शहरातून सामाजिक समता रॅली काढण्यात आली. सामाजिक समतेचा संदेश देत रॅलीच्या माध्यमातून शहरवासीयांचे प्रबोधन करण्यात आले. नागरिकांचा व विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
हे ही पहा : History | आचार्य प्र.के.अत्रे दिग्दर्शित ‘महात्मा फुले’ चित्रपट पहाण्यासाठी लिंक
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.