Social | वसुंधरा मित्र : सुरेश खामकर आणि लतीफ राजे आता सरकारी ‘मास्टर ट्रेनर’

अहमदनगर | १७.१० | रयत समाचार

(Social) पर्यावरण संवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे हरियाली संस्थेचे अध्यक्ष वनश्री सुरेश खामकर (नगर) आणि सृष्टी मित्र संस्थेचे कार्यकर्ते लतीफ राजे (ढवळपुरी, ता. पारनेर) यांची महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागामार्फत ‘वसुंधरा मित्र’ (मास्टर ट्रेनर) म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.

(Social) या नियुक्तीद्वारे दोन्ही पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील ‘राष्ट्रीय हरित सेना’ (इको क्लब) च्या शिक्षकांना पर्यावरण विषयक प्रशिक्षण देणार आहेत. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव आणि कृतीशील दृष्टी निर्माण करण्यासाठी शासनाचा हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे.

(Social) नुकत्याच नाशिक येथे झालेल्या विभागीय कार्यशाळेत ‘वसुंधरा मित्र’ प्रशिक्षण पूर्ण करून दोन्ही कार्यकर्त्यांनी अधिकृतपणे जबाबदारी स्वीकारली. विभागीय वनाधिकारी (सामाजिक वनीकरण), अहिल्यानगर अमोल जाधव यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

सुरेश खामकर हे गेल्या अनेक वर्षांपासून हरियाली संस्थेच्या माध्यमातून झाडे लाव, प्लास्टिकमुक्ती मोहीम, पर्यावरण जनजागृती शिबिरे अशा विविध उपक्रमांतून पर्यावरण संवर्धनासाठी कार्यरत आहेत. तर लतीफ राजे हे ढवळपुरी येथील प्राथमिक आश्रमशाळेत कार्यरत असून, पारनेर तालुक्यात ‘सृष्टी मित्र’ संस्थेच्या माध्यमातून शालेयस्तरावर हरित चळवळीचे काम करत आहेत.

आगामी काळात हे दोन्ही ‘वसुंधरा मित्र’ जिल्ह्यातील हरित सेनेच्या शाळांतील मुख्याध्यापक व शिक्षकांना मार्गदर्शन कार्यशाळा घेऊन पर्यावरण विषयक प्रशिक्षण देणार आहेत.

Share This Article