भिंगार | २०.१० | रयत समाचार
(Social) “जेथे गरज, तेथे उन्नती” या ब्रीदवाक्याशी एकनिष्ठ राहून उन्नती सेवाभावी संस्था, भिंगार यांनी यंदाच्या दिवाळीत एक हृदयस्पर्शी उपक्रम राबवला. पाथर्डी तालुक्यातील निवडूंगे आणि करंजी येथील भूमिहीन पुरग्रस्त कुटुंबांच्या घरात या संस्थेने दिवाळीचा आनंद पोहोचवला.
(Social) ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यातील भीषण पावसात नदी-ओढ्यांच्या काठावर राहणाऱ्या अनेक वंचित व भूमिहीनांचे संसार वाहून गेले. शेतीसह घरांचे प्रचंड नुकसान झाले. या संकटग्रस्त कुटुंबांच्या मदतीसाठी ‘उन्नती सेवाभावी संस्था’ पुढे सरसावली आणि त्यांच्या दिवाळीला उजाळा देण्याचा निर्धार केला.
(Social) या उपक्रमांतर्गत निवडूंगे व करंजी येथील एकूण ३० भूमिहीन पुरग्रस्तांना प्रत्येकी सुमारे ₹१२५० किंमतीचा किराणा कीट देण्यात आला. या कीटमध्ये दिवाळी सणासाठी आवश्यक वस्तूंसह गोडधोड साहित्यही समाविष्ट होते.
या कार्यात संस्थेचे कार्याध्यक्ष गणेश उपरे, पालक दत्ता लोखंडे, तसेच पराग खूपसे, ज्ञानेश्वर फासे, रमेश बोंदर्डे, उमाकांत आस्मर आणि गजानन भंडारे यांनी मोलाचे सहकार्य केले. संस्थेचे अध्यक्ष दिलीप आस्मर, तसेच शाम थोरात, राजाभाऊ शिर्के, सचिन गायकवाड आणि संगीता वरुडे यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन लाभले. उपक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी वैभव विधाटे यांनी सक्रिय सहभाग आणि महत्त्वपूर्ण मदत केली.
या उपक्रमामुळे दिवाळीचा प्रकाश फक्त दिव्यांपुरता मर्यादित न राहता, गरजूंंच्या चेहऱ्यावरचा हास्य बनून झळकला. समाजात मानवतेचा हा दीप प्रज्वलित करणाऱ्या ‘उन्नती’च्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
