मुंबई | गुरूदत्त वाकदेकर
(Social) राज्यातील मराठा जातीतील पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र तसेच जातवैधता प्रमाणपत्र देण्यासाठी तालुकास्तरावर गठीत वंशावळ समितीच्या कामकाजाचा कालावधी आणखी दोन वर्षांनी वाढविण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने २९ ऑगस्ट २०२५ रोजी काढला असून या समित्यांची मुदत ३० जून २०२६ पर्यंत वाढविण्यात आल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिली.
(Social) या समित्या तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत आहेत. राज्यातील मराठा जातीला कुणबी समाजातील ऐतिहासिक व पुराव्यांवर आधारित नोंदी तपासून जात प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू आहे. तथापि, मोठ्या प्रमाणात प्रकरणे प्रलंबित असल्याने शासनाने या समित्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला.
(Social) याआधीही शासनाने समित्यांची मुदतवाढ दिली होती. २४ सप्टेंबर २०२४ रोजी गठीत करण्यात आलेल्या समित्यांचा कार्यकाळ ३० जून २०२४ रोजी संपुष्टात आला होता. मात्र, वाढीव मुदतीचा कालावधी संपण्यापूर्वीच शासनाने पुन्हा एकदा विस्तार देण्याचा निर्णय घेतला असून आता ३० जून २०२६ पर्यंत मुदत राहणार आहे.
या निर्णयामुळे मराठा जातीतील पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया अखंडितपणे सुरू राहणार.
