कडेगाव, सांगली | १२.२ | रयत समाचार
(Social) आज समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, ते बदलण्यासाठी समाजाने सक्षमपणे संघटीत होणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन माजी विशेष मुंबई पोलीस महानिरीक्षक सुरेश खोपडे यांनी केले. सांगली येथील हणमंतवडीये (ता. कडेगाव) येथे क्रांतिवीर भाई भगवानराव पाटील बप्पा जन्मशताब्दी समिती व कडेगाव खानापूर मराठी साहित्यप्रेमी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
(Social) यावेळी क्रांतिवीर भाई भगवानराव पाटील बप्पा सामाजिक पुरस्कार प्राचार्य डॉ. शिवाजीराव कदम यांना प्रदान करण्यात आला. तसेच क्रांतिविरागना हौसाताई पाटील पुरस्कार सामाजिक कार्यकर्त्या डॉ. गिरीजा शिंदे यांना सुरेश खोपडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने ‘क्रांतीसिंह नाना पाटील : अंधश्रद्धा निर्मूलन’ या ॲड. सुभाष पाटील यांच्या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
(Social) खोपडे पुढे म्हणाले की, आज देशाची अवस्था बिकट आहे. उद्या नातवाने देशाबद्दल प्रश्न विचारला तर पालकांसमोर उत्तर देण्याचे आव्हान उभे राहील. भयमुक्त समाज निर्माण करण्यासाठी संघटीतपणे सक्षम प्रतिउत्तर देणे गरजेचे आहे. समाजाचे प्रबोधन करूनच भयमुक्त देश घडवता येईल.
पुरस्कार स्वीकारताना डॉ. शिवाजीराव कदम म्हणाले, हा पुरस्कार माझ्या मातीचा आणि घराचा असल्याने सर्वाधिक मोलाचा आहे. शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवण्यासाठी समाज जागृत होणे आवश्यक आहे.
तर डॉ. गिरीजा शिंदे म्हणाल्या, हा पुरस्कार मला सामाजिक कार्यासाठी अधिक ऊर्जा, बळ आणि जबाबदारी देणारा आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वागत इंद्रजीत पाटील यांनी केले. प्रास्ताविक प्रा. विश्वनाथ गायकवाड यांनी मांडले. मानपत्र वाचन रघुराज मेटकरी व संगिता पाटील यांनी केले.
कार्यक्रमास ॲड. सुभाष पाटील, खंडेराव शिंदे, प्रा.डॉ. बाबूराव गुरव, विलासराव पाटील, जे.के. जाधव (बापू), सुनिल गुरव, हिम्मतराव पवार, दत्तात्रय खंडागळे, प्रा. डी.जी. कणसे यांच्यासह अनेक ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन प्राची पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन सदानंद माळी यांनी मानले.