पुणे | २४ जानेवारी | प्रतिनिधी
(rip news) मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व रामचंद्र अण्णाजी उर्फ रामभाऊ जोशी यांचे काल, गुरूवारी ता.२३ जानेवारी रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांचे वय १०१ वर्षे होते. अर्धशतकाहून अधिककाळ पत्रकारितेत व्यतित केल्यावर निवृत्तीनंतरही त्यांनी विविध नियतकालिके, मासिके, विशेषांक यातून आपले लेखन करण्यात रामभाऊंनी खंड पडू दिला नव्हता. केवळ मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण होऊनही आपल्या परिश्रम, जिद्द, अभ्यास, कार्यनिष्ठा आणि लोकसंग्रह यांच्या बळावर पत्रकारितेप्रमाणेच सांस्कृतिक क्षेत्रातही अव्वल दर्जाचे यश मिळवले. स्व. रामभाऊंना विनम्र श्रध्दांजली.
स्व. रामभाऊ जोशी यांचा अल्प परिचय
(जन्म : १३ डिसेंबर १९२३ – निधन २३ जानेवारी, २०२५)
(rip news) स्व. रामभाऊ जोशी यांनी सन १९५० मध्ये पत्रकारितेत प्रवेश केला आणि त्यानंतर पुणे येथे सायं. दैनिक ‘लोकराज्य’, दै. संध्या, दैनिक केसरीत उपसंपादक, प्रमुख वार्ताहर, सहसंपादक, कमर्शियल एडिटर अशा विविध पदांवर काम करताना पत्रकारितेच्या क्षेत्रात एक आगळा ठसा उमटवून ठेवला. त्यांनी चौफेर पत्रकारिता करण्यासाठी गुंतून न पडता संधीचा लाभ घेऊन आसेतु हिमाचल अशी देशातील सर्व राज्य, प्रदेश त्यांनी आपले कार्यक्षेत्र बनविले होते. १९६५ च्या भारत-पाक युध्दाच्या वेळी ते केसरीचे प्रतिनिधी म्हणून पंजाबात तळ ठोकून राहिले. युध्द आघाड्यांवर हिंडले. बांगला युद्धाच्या वेळी त्यांनी कलकत्त्याकडे धाव घेतली. बातमी आणि माहिती, लष्करी हालचाल, उद्ध्वस्त प्रदेश व तेथील जीवन इत्यादींची चक्षुर्वसत्यम हकिगत त्यांनी लेखमालेतून वाचकांपर्यंत पोहोचवली. अहमदाबाद, जळगाव, भिवंडी, औरंगाबाद, मुंबई वगैरे ठिकाणी जेथे जेथे जातीय दंगली उसळल्या तेथे तेथे जाऊन स्व. रामभाऊंनी प्रसंगी धोका पत्करून वाचकांपर्यंत सचित्र इतिवृत्त पोहोचविण्याची कामगिरी चोखपणे पार पाडली होती.
पत्रकार या नात्याने काम करीत असताना त्यांनी प्रचंड लोकसंग्रह केला. स्वर्गिय यशवंतराव चव्हाण यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे मैत्रीचे बंधुतुल्य संबंध होते. कृतिशील पत्रकारिता करीत असतानाच पत्रकार संघटनांच्या कार्यात त्यांनी आपला सहभाग दिला. पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष, महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघाचे सलग चार वर्षे अध्यक्ष, तसेच इंडियन फेडरेशन ऑफ जर्नालिस्ट या अ.भा.संघटनेच्या कौन्सिलचे सदस्य म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केले.
स्व. रामभाऊंचे सहा ग्रंथ प्रकाशित झाले असून त्यातील ‘यशवंतराव – इतिहासाचे एक पान’ हा चरित्रात्मक ग्रंथ सर्वमान्य ठरला होता. याखेरीज स्व. सौ. वेणूताई चव्हाण यांच्या जीवनावरील ‘ही ज्योत अनंताची’ हे त्यांचे पुस्तक प्रसिध्द झाले आहे.
स्व. रामभाऊ जोशी हे पत्रकार साहित्यिक म्हणून ज्ञात होते. पुणे येथील ‘सवाई गंधर्व संगीत महोत्सवा’च्या आयोजनातही त्यांचा अनेक वर्षे सक्रिय सहभाग राहिला होता, अशी माहिती मुंबई मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष कुमार कदम यांनी दिली.
हे ही वाचा : Religion: गोरक्षनाथ मराठी होते काय ? – टी. एन. परदेशी
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.