राज की बात
अहमदनगर | ॲड. श्याम आसावा
Public Opinion अखेर अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये राजकीय टिप्पणीमुळे वातावरण बिघडले व येणाऱ्या निवडणुका कोणत्या दिशेने जाणार आहे त्याची चुणूक दिसली.
राजकारण हा समाजाचा आरसा आहे, असे म्हटले जाते. त्यामुळे जेव्हा राजकारणात कमरेखालच्या शब्दांचा वारेमाप वापर होतो किंवा राजकारण्यांच्या जिभा वारंवार घसरत राहतात, त्यांच्या समाजाची संस्कृतीही त्यावरून मोजली जाते. राजकारण म्हटलं की, आरोप–प्रत्यारोप होणारच, कलगीतुरा रंगणारच पण ते करत असताना सध्या राजकारणाचा ढळलेला तोल, वाढलेली मग्रुरी, हरवलेला ‘सुसंस्कृतपणा’ फार अस्वस्थ करणारा आहे.
कधीकाळी सुसंस्कृत, शिष्टाचारी आणि विवेकी राजकारणी या राज्यात होते. आता अशी परिस्थिती झाली आहे, राजकारण म्हणजे केवळ आततायीपणा, उतावीळपणा, उठावळपणा, वाचाळपणा, शिवीगाळ असा समज काही नेत्यांचा झाला. ‘गाडून टाकीन, ठेचून काढील, फोडील, थोबाड फोडेन, वळू, जल्लाद, मौत-का-सौदागर, दो करोड की गर्लफ्रेंड, महिला उमेदवाराच्या अंतर्वस्त्राचे रंग…’अशी भाषा सत्ता व पैशाच्या माजामुळे आली. राजकारणात भाषेचा स्तर पाळायचाच नाही, असे काही नेत्यांनी तर ठरवूनच टाकलेले दिसते. ही घसरण गंभीर आहे. त्यामुळे काही मतदारांच्या मनात राजकारण्यांविषयी तिरस्कार व घृणा वाढून ते मतदानालाच फिरकण्याचे टाळत आहेत.
सर्वसाधारणपणे नेते बोलतात तीच भाषा कार्यकर्त्यांच्या तोंडी येते. हे धोकादायक आहे. राज्यात अशा प्रकारचे विद्वेषाचे वातावरण कधीच नव्हते. राजकारण्यांची बेताल, असंस्कृत ‘मुक्ताफळं’ ऐकताना उबग आला आहे. त्यांना लोकभावनांची पर्वा राहिलेली नाही.
एकूणच या जिभेंला लगाम घालण्याचे उपाय जर पक्षांच्या नेत्यांना करता येत नसतील तर आता मतदारांनाच करावी लागेल.
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.