Press | सुरेश वाळवे यांच्या निधनाने गोमंतकीय पत्रकारितेतील दिलखुलास पर्वाचा अस्त

उपसंपादक | दिपक शिरसाठ

गोवा | २७.११ | प्रभाकर ढगे

(Press) दैनिक ‘नवप्रभा’ चे सिद्धहस्त संपादक सुरेश वाळवे यांच्या निधनाने गोमंतकीय मराठी पत्रकारितेतील एक दिलखुलास आणि उमदेपणाने जगलेले पर्व संपुष्टात आले.

(Press) अतिशय टापटीप राहणीमान, अचूक लेखनशैली आणि वृत्तपत्राला वाचकाभिमुख बनविण्याची हातोटी या गुणांनी वाळवे यांनी ‘नवप्रभा’ ची वृत्ती आणि प्रकृती घडविली. संपादक म्हणून ते सदैव जागरूक, संवेदनशील आणि मोकळ्या मनाचे होते.

(Press) संपादकांमध्ये परस्पर कौतुकाची परंपरा विरळच असते, मात्र सुरेश वाळवे हे त्या अपवादातील अपवाद होते. इतर संपादकांचे लेख, अग्रलेख आवडले वा न आवडले, दोन्ही प्रकारांवरही ते तत्परतेने प्रतिक्रिया द्यायचे, फोन करून मत व्यक्त करायचे.

पत्रकारितेतील मतभेदांनाही त्यांनी कधी कटुता येऊ दिली नाही. ‘भायल्यांची दादागिरी’ या त्यांच्या अग्रलेखास प्रत्युत्तर म्हणून लिहिलेल्या ‘वाळवे, तुम्हीही भायलेच’ या अग्रलेखातील टीका त्यांनी खेळकरपणे स्वीकारली आणि उलट त्या लेखकाचे कौतुक केले, हेच त्यांच्या व्यापक मनाचे प्रतीक होते.

गोव्यातील राजकीय व सामाजिक प्रश्नांवर त्यांचे आकलन नेहमीच सूक्ष्म व प्रामाणिक राहिले. “आमचा पेपर खाण मालकाचा, मी नाही लिहू शकत… पण तुम्ही लिहा बिनधास्त,” असे सांगून सत्य लेखनाला त्यांनी नेहमी प्रोत्साहन दिले.

डिचोली तालुक्यातील व्हाळशी गावातील ओहोळकिनारी वसलेले त्यांचे निवासस्थान आणि स्वतःच्या खर्चाने उभारलेला मंडप व वाचनालय, हे त्यांच्या संस्कारशील व समाजाभिमुख वृत्तीचे साक्षीदार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने वाळवे कुटुंबाला दिलेले मोडी लिपीतील आज्ञापत्र त्यांनी जपून ठेवले होते. इतिहास आणि वारसा यांचा अभिमान त्यांच्यात होता.

मराठी व कोकणी या भाषिक वादात त्यांनी नेहमी तटस्थ परंतु न्याय्य भूमिका घेतली. ते स्पष्टवक्ते, धारदार आणि लोकाभिमुख संपादक म्हणून ओळखले जात. सर्वसामान्यांच्या प्रश्नांना आपल्या अग्रलेखातून आवाज देणाऱ्या या संवेदनशील पत्रकाराची उणीव गोमंतकीय पत्रकारिता दीर्घकाळ भासेल. सुरेश वाळवे यांच्या स्मृतीस भावपूर्ण आदरांजली.

Share This Article