Press | माध्यमांनी सकारात्मक बातम्यांवर भर द्यावा– ब्रह्माकुमार करुणाभाई यांचे आवाहन

अबू रोड | ३०.९ | श्रीकांत काकतीकर

(Press) आजच्या धकाधकीच्या जीवनात पत्रकारांवर ताणतणावाचे सावट वाढले आहे. डिजिटल माध्यमे आणि स्पर्धेच्या युगात वृत्तपत्रसृष्टीत सतत नवनवीन बदल होत असताना समाजात शांतता आणि सद्भावना निर्माण करण्यासाठी माध्यमांनी सकारात्मक बातम्यांना प्राधान्य द्यावे, असे स्पष्ट आवाहन प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या मीडिया विंगचे प्रमुख ब्रह्माकुमार करुणाभाई यांनी केले.

 

(Press) प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयाच्या वतीने शांतीवन येथे राष्ट्रीय पत्रकार संमेलनाचे आयोजन करण्यात आले. या संमेलनाच्या निमित्ताने बेळगाव जिल्ह्यातील पत्रकारांनी करुणाभाई यांची भेट घेतली. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले, पत्रकारांना धकाधकीचे जीवन जगावे लागत असून मानसिक शांतीची नितांत गरज आहे. सकारात्मक बातम्यांचा प्रसार केल्याने समाजातच नव्हे तर पत्रकारांच्या वैयक्तिक जीवनातही शांतता निर्माण होऊ शकते.

 

(Press) दरम्यान, बेळगाव प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय आणि शहापूर येथील बॅरिस्टर नाथ पै गणेशोत्सव मंडळाच्या संयुक्त विद्यमाने यंदाच्या गणेशोत्सवात रक्तदान शिबिर व नशामुक्ती अभियान राबविण्यात आले होते. या उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित उपक्रमांतर्गत केलेल्या सहकार्याबद्दल मंडळाचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील यांनी ब्रह्माकुमार करुणाभाई यांचा शाल व स्मृतीचिन्ह देऊन श्रीकांत काकतीकर यांच्या हस्ते गौरव केला.

 

यावेळी बेळगाव प्रजापिता ब्रह्माकुमारी विद्यालयाचे ब्रह्माकुमार शिवानंद भाई, ब्रह्माकुमार शांतिलाल भाई तसेच हुबळी-धारवाड येथील पत्रकार उपस्थित होते.

 

Share This Article