SHIVSENA LIVE | ‘नरकातला स्वर्ग’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा! | रविंद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी #LIVE पहा : https://www.facebook.com/share/v/1XrtpqwhJf/
मुंबई | १८ मे | प्रतिनिधी
(Politics) येथे ता.१७ मे रोजी ‘सामना’ आणि ‘न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस’ यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झालेल्या संजय राऊत यांच्या लेखणीतून उतरलेला “नरकातला स्वर्ग (तुरुंगातले अनुभव)” या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात शरद पवार आवर्जून सहभागी झाले; या पुस्तकाबद्दलचे मनोगत उपस्थितांसमोर व्यक्त केले ते असे.
(Politics) सन्माननीय व्यासपीठ आणि आपण सगळे बंधू-भगिनींनो..! आजचा हा कार्यक्रम लक्षात राहणारा असा हा कार्यक्रम आहे. संजय राऊत यांनी जे काही १०० दिवस ‘आर्थर रोड’ या माहित असलेल्या जेलमध्ये घालवले आणि तिथले सगळे अनुभव लिखित स्वरूपामध्ये आपल्या सगळ्यांसमोर मांडले. कुणी गुन्हा केला असला, त्याच्यावर केस झाली असेल, त्याचा निकाल लागला असेल तर असं संकट काही लोकांवर येत असतं. पण संजय राऊत यांनी काय केलं होतं? संजय राऊत नेहमीच ‘सामना’मध्ये जी रोखठोक भूमिका मांडतात, ती आपल्या स्वभावाप्रमाणे मांडत असत. ती त्यांची लेखणी काही लोकांना पचत नव्हती, ते अस्वस्थ होते. मोठ्या संधीची ते वाट पाहत होते आणि त्यांना संधी दिली पत्रा चाळ ही जी एक वस्ती आहे त्या प्रकरणातून.
(Politics) पत्रा चाळीमध्ये कष्ट करणारे मध्यमवर्गीय लोक राहत होते. त्यांच्या निवाऱ्याचा काही प्रश्न निर्माण झाला. त्या चाळकऱ्यांना घरं मिळावीत, अशा प्रकारची मागणी त्यांच्याकडे होती आणि ते संजय राऊत यांच्याकडे पोहोचले. त्याच्यामध्ये संधी मिळाली ती त्यांच्या नेहमीच्या लिखाणामुळे जे दुखावलेले होते, त्या शासकीय यंत्रणेला. ईडी यांचं योगदान या प्रकरणामध्ये अधिक आहे. ईडीने जी केस केली त्याच्यामध्ये संजय राऊत यांचा यत्किंचितही संबंध नसताना त्यांना त्याच्यामध्ये गुंतवण्यात आलं. जिथं अन्याय होतो, अत्याचार आहे त्याच्या विरुद्ध ‘सामना’ उभा राहतो. ते काम अखंडपणाने त्यांचं चालू होतं. शासकीय यंत्रणेमध्ये जिथे भ्रष्टाचार आहे, त्या भ्रष्टाचाराविरुद्ध ते नेहमीच लिहितात. याची आपल्या सर्वांना कल्पना आहेच.
मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये काही लोक चुकीचं काम करतात, हे माहीत असताना त्यांच्या संबंधीची कारवाई होत नव्हती. संजय राऊत यांनी खासदार म्हणून देशाच्या प्रमुखांना यासंबंधीचं पत्र लिहिलं. जे लोक शासकीय यंत्रणेशी भ्रष्टाचाराच्या मार्गाने संबंध ठेवतात, अशा लोकांमार्फत पैसे कसे गोळा केले जातात? याचं सविस्तर लिखाण त्यांनी केंद्र सरकारला कळवलं. त्यामध्ये जवळपास ३० ते ३५ लोक असे होते, कंपन्या अशा होत्या की ज्यांच्याकडून पैसे काढले गेले. ती रक्कम ५८ कोटींच्या आसपास होती. ही माहिती संजय राऊत यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी देशाच्या प्रमुख लोकांना लिखित स्वरूपात ती दिली. त्याचा परिणाम एकच झाला ‘कारवाई झाली नाही, त्यांना आत जावं लागलं’. त्यांना अटक करण्यात आली, १०० दिवस त्या ठिकाणी राहता आलं. त्यांनी हे पुस्तक लिहिलं त्यामुळे आम्हा लोकांना अनेकांना ते वाचल्यानंतर कळेल की, तिथली स्थिती काय आहे? ती स्थिती निश्चितपणाने दुरुस्त करण्याचा विचार आज ना उद्या आपल्याला करावाच लागेल. त्यांच्या जेलमधल्या सगळ्या आठवणी आणि अनेकांच्या भेटीगाठी व त्यांचा अनुभव हा लक्षात येणार आहे.
एकनाथ खडसे आमचे सहकारी आहेत. त्यांचे जावई हे इंग्लंडमध्ये होते. ‘टाटा कन्सल्टन्सी’ या संस्थेमध्ये मोठ्या जॉबवर होते. खडसेंवर इथे काहीतरी तक्रार आली. त्यांना त्रास होईल असं कळलं म्हणून त्यांचे जावई लंडन सोडून इथे आले. इथे आल्यानंतर ईडीने त्यांना अटक केली, त्यांचा काहीही संबंध नव्हता. त्यांना अटक केली आणि त्यांना तुरुंगवास त्या ठिकाणी आला. अनेक लोक त्या ठिकाणी होते. अनिल देशमुख इथे आहेत, त्यांच्यावर एका शासकीय अधिकाऱ्याने तक्रार केली की, यांनी १०० कोटींचा भ्रष्टाचार केला. शेवटी केस जी कोर्टात गेली त्याच्यामध्ये शंभरचा आकडा हा गेला, त्यातील दोन शून्य गेले आणि ‘०१ कोटीचा भ्रष्टाचार’ हा त्यांच्यावर आरोप केला गेला. आरोप करणारे जे लोक आहेत, ते अधिकारी असे होते की राज्य सरकारने भ्रष्टाचाराच्या संदर्भात त्यांच्यावर काही कारवाई केलेली होती. पण त्यांना राहावं लागलं त्या ठिकाणी. असे अनेक नाव सांगता येतील. भोसलेंचा उल्लेख या ठिकाणी केला. पण मला एका गोष्टीची गंमत वाटली की, या सगळ्या मंडळीला त्या ठिकाणी त्रास होता. पण ते कधी नमले नाहीत, एकत्र राहिले, एकमेकांना धीर देत राहिले. त्या माध्यमातून त्या सगळ्या संकटातून ते बाहेर कसे निघतात, या संबंधाची काळजी घेतली.
हे पुस्तक प्रसिद्ध होणार आहे, हे गेले दोन दिवस आपण वाचतोय व टेलिव्हिजनवर पाहतोय. मला आश्चर्य वाटलं की, सत्ताधारी पक्षाच्या लोकांना ते पुस्तक आतून न वाचता कसं समजलं? हे मला माहित नाही. प्रचंड टीका त्या पुस्तकावर आणि राऊतांवर गेले दोन दिवस आपण या ठिकाणी पाहतोय. कुणी सांगितलं की, मी बाल साहित्य वाचत नाही. कुणी आणखीन काही सांगितलं, अनेक मतं त्या ठिकाणी दिलेली आहेत. मी हे जे पुस्तक लिहिलं त्याच्यातून जी माहिती येते ती बघितल्यानंतर एकंदर सत्तेचा गैरवापर कसा होतो? याचं उत्तम लिखाण या पुस्तकाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेसमोर आलेले आहे.
ईडी ही जी यंत्रणा आहे, ती कशी वागते? याचं उत्तम लिखाण या पुस्तकामध्ये आहे. मला आठवतंय केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळात त्यावेळी मी होतो. चिदंबरम आमचे सहकारी होते आणि चिदंबरम यांनी कायद्यामध्ये कशी दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे? यासंबंधीचा प्रस्ताव हा मंत्रिमंडळासमोर आणला. तो वाचल्यानंतर मी डॉ. मनमोहन सिंग यांना सांगितलं की, हे जे प्रस्ताव आहेत ते अत्यंत घातक आहे, हा आपण करता कामा नये. ज्याचा उल्लेख या ठिकाणी केला गेला की, जेव्हा गुन्हेगार म्हणतो, पोलीस सांगतात, ईडी म्हणतात त्यांनी स्वतःहून मी गुन्हा केला नाही, हे सिद्ध करायचं. त्या संबंधाची तरतूद ही कायद्यामध्ये प्रस्तावित केली. त्याला मी सक्त विरोध केला की, हे करू नका. उद्या राज्य बदललं की, त्याचे परिणाम आपल्याला सुद्धा भोगावे लागतील. पण ते ऐकलं गेलं नाही. राज्य गेलं आणि पहिली ॲक्शन ही चिदंबरम यांच्यावरच घेतली गेली व त्यांना अटक केली गेली. सत्तेचा गैरवापर त्या ठिकाणी झाला. विशेषतः विरोधकांवर अशा केसेस या अधिक केल्या जातील, ही शंका माझ्यासारख्याला होती.
हे काही लिखाण केलं, त्यामध्ये राऊत यांनी दोन राजवटींचा उल्लेख केलेला आहे. एक एनडीएच्या काळात आणि नंतर यूपीएच्या काळामध्ये. ईडीने कोणत्या पक्षांवर केसेस केल्या? याची माहिती त्यांनी दिली. एनडीएच्या काळामध्ये १९ जणांवर कारवाई केली होती. यूपीएच्या काळामध्ये ०९ लोकांवर आरोप पत्र दिलं, अटक कोणालाही केली गेली नाही. पण एनडीएच्या काळामध्ये काँग्रेस, टीएमसी, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, द्रमुक, डीएमके, बिजू जनता दल, आरजेडी, बसपा, समाजवादी पार्टी, टीडीपी, आप, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, नॅशनल कॉन्फरन्स, अन्ना द्रमूक, मनसे, टीआरएफ एवढ्या पक्षांच्या नेत्यांवर चौकशी करून केसेस करण्यात आल्या. याचा अर्थ देशातील सबंध अपोझिशन हेच उध्वस्त करायचं. या कायद्याच्या माध्यमातून हा निकाल या ठिकाणी घेतलेला होता. त्याचाच परिणाम अनेकांना त्या ठिकाणी सहन करावा लागला.
हे पुस्तक वाचल्यानंतर मी एवढंच विचार करतोय कधी महाराष्ट्र किंवा देशातल्या जनतेनं देशात परिवर्तन केलं तर पहिलं काम हे करावं लागेल की सामान्य माणसांचा, राजकीय पक्षांचा जो मूलभूत अधिकार आहे तो या ईडी कायद्याचा आधार घेऊन उध्वस्त करण्याची जी काही तरतूद कायद्यामध्ये झालेली आहे ती तातडीने बदलली पाहिजे. त्यासाठी काय करावं लागेल, ते करणं यामध्ये आम्हा लोकांना लक्ष द्यायची आवश्यकता आहे. म्हणून हे पुस्तक जे कोणी वाचतील, त्यातल्या त्यात राज्यकर्ते जे असतील त्यांनी हे सगळं गांभीर्याने बघण्याची गरज आहे. राज्य येतं- जातं, निवडणुका जिंकतात- हरतात. पण न्यायव्यवस्था ही लोकांसमोर आदर्श अशी असली पाहिजे. ती व्यवस्था ईडी सारख्यांच्या हातात दिलेल्या शक्तीमुळे जर आपल्याला निर्णय घेण्यासाठी इच्छा असून सुद्धा मर्यादा येत असतील तर ती बदलण्याची आवश्यकता आहे, याची खात्री ही आपल्या सगळ्यांना पटली.
माझ्या मते, राऊत यांनी हे पुस्तक लिहून फार मोठं काम केलं. त्यामुळे विचार करणारे लोक माझी खात्री आहे की याच्यात दुरुस्ती करण्याची जी आवश्यकता आहे, सत्तेचा गैरवापर हा सहज केला जातो. ही जी संधी राज्यकर्त्यांना आपण दिली, त्याच्यातून मुक्त होण्याचं काम हे करण्याबद्दलचं विचार करावा लागेल. राऊत यांच्या या पुस्तकामुळे आणि विशेषतः आता सांगण्यात आलं की, इंग्लिश आणि हिंदीमध्ये सुद्धा करणार आहेत. त्याचा परिणाम निश्चित जे लोकप्रतिनिधी असतील, लोकशाही संबंधाची आस्था ज्यांच्यामध्ये आहे ते लोक त्याचा विचार करतील. त्या कामामध्ये तुमची आणि माझी सगळ्यांची जबाबदारी आहे की, अशांच्या पाठीशी उभं राहणं. हे काम केलं तर माझी खात्री आहे की, संजय राऊत यांनी जे लिखाण केलं ते खऱ्या अर्थाने फलदायी ठरलं, असा निष्कर्ष काढता येईल. धन्यवाद!
वरील भाषण लाईव्ह ऐका : https://www.facebook.com/share/v/1E9vWCgeED/
Cultural Politics | “एकेकाळी ‘लाल’ असलेला अहमदनगर जिल्हा ‘भगवा’ कधी झाला, हे समजलेच नाही” असे म्हणणाऱ्या शरद पवारांचा करिश्मा गेला कुठे ?
