अहमदनगर | १९ एप्रिल | प्रतिनिधी
(Politics) ग्रामीण भागात टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी स्वतंत्र ॲप तयार करावे. टँकर सुरू असलेल्या गावात पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक जाहीर करावे, जेणेकरून ग्रामस्थांना टँकरची वाट पाहावी लागणार नाही. तालुका पातळीवर पाणीपुरवठ्यासाठी जबाबदार अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, असे निर्देश जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.
(Politics) जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पाणी टंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीसाठी आमदार काशिनाथ दाते, अमोल खताळ, विठ्ठलराव लंघे, विक्रम पाचपुते, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महापालिका आयुक्त यशवंत डांगे, उप वनसंरक्षक धर्मवीर साळविठ्ठल, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, आदी उपस्थित होते.
(Politics) यावेळी विखे पाटील म्हणाले, तहसीलदार आणि गट विकास अधिकारी यांनी पाण्याच्या उद्भवात उपलब्ध पाणीसाठ्याची स्वतः खात्री करावी. पाण्याचा उद्भव गावापासून कमी अंतरावर राहील याची दक्षता घ्यावी. पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरच्या स्वच्छतेकडेही लक्ष द्यावे आणि पाण्याचे नमुने वेळोवेळी तपासावेत. पाण्याचे नमुने तपासल्याशिवाय टँकर भरू नये. टँकर वेळेवर न आल्यास संपर्कासाठी व्यवस्था करण्यात यावी. जनतेला गरजेएवढे पाणी मिळावे, ही शासनाची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.
पालकमंत्री म्हणाले, जलसंपदा अधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत समन्वय ठेऊन शेवटच्या टोकापर्यंत पाणी मिळेल याचे नियोजन करावे. पाणी उपलब्ध असताना ग्रामीण पाणी पुरवठा योजना बंद पडणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावे. नागरिकांसोबत पशुधनालाही पुरेसे पाणी उपलब्ध होईल असे नियोजन करावे. प्रत्येक पाणी पुरवठा योजनेचे शुद्धीकरण प्रकल्प सुरु राहतील याची दक्षता घ्यावी. तलाव परिसरातील विंधनविहिरी आणि विहिरी आवश्यकतेनुसार अधिग्रहित कराव्या. पाणी योजनेसाठी सौर ऊर्जेचा उपयोग करण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या. विखे पाटील यांनी जिल्ह्यातील चारा उपलब्धतेची माहितीही यावेळी घेतली, तसेच अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे शेतपिकाच्या नुकसानीचा आढावा घेण्यात आला.
यावेळी उपस्थित आमदार महोदयांनी उपयुक्त सूचना केल्या. ग्रामीण भागात पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल असे जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले. निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांनी सादरीकरणाद्वारे टंचाई निवारणासाठी जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

हे ही वाचा : Political Economy: बोनस : राजकीय अर्थव्यवस्था समजून घ्या, अर्थसाक्षर व्हा– संजीव चांदोरकर
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.