मुंबई | १५ जुलै | गुरुदत्त वाकदेकर
(Mumbai news) मराठी काव्यप्रेमींना श्रावणाच्या सरींसह रसिकतेचा अनुभव देणाऱ्या एका आगळ्या-वेगळ्या काव्यसोहळ्याचे आयोजन दादर पूर्व येथील इंडियन एज्युकेशन सोसायटी, राजा शिवाजी विद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले. ‘श्रद्धेच्या सुरांनी भारलेली त्रिसंधी; भक्ती, कृतज्ञता आणि श्रावणाचा काव्यसाज’ या संकल्पनेवर आधारलेला हा सतरावा कविसंमेलन सोहळा रसिकांच्या मनात कायमस्वरूपी ठसा उमटवून गेला.
(Mumbai news) मराठी साहित्य व कला सेवा आणि शोध आनंदाचा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने, सायंकाळी ४:३० ते ७:३० या वेळेत संपन्न झालेल्या या कार्यक्रमात भक्तीरस, गुरुचरणी कृतज्ञता आणि श्रावणातील आठवणींनी सजलेली सृजनात्मक त्रिसंधी उभी राहिली.
(Mumbai news) कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची त्रिसंधी संकल्पनानुसार सत्रबद्ध मांडणी. पहिले सत्र– “भक्तिरसाने भारलेली काव्यसंध्या” विठोबा, हरिपाठ, वारकरी संप्रदाय आणि आषाढी एकादशीच्या भक्तिभावपूर्ण पार्श्वभूमीवर साकारले गेलेले हे सत्र रसिकांची अंतःकरणे व्यापून गेले. टाळ-मृदंगाच्या आभासी नादात साकारलेले हे काव्य केवळ ऐकण्याचा अनुभव न देता, ते प्रत्यक्षपणे अनुभवण्याचा क्षण ठरला.
दुसरे सत्र– “गुरुचरणी नतमस्तक” गुरुपौर्णिमा विशेष सत्रात गुरु-शिष्य नात्याच्या गूढतेचा, आदरभावाचा, श्रद्धेचा आणि कृतज्ञतेचा भाव कवितांमधून अत्यंत हृदयस्पर्शी स्वरूपात प्रकट झाला. विविध कवींनी आपल्या गुरूंसाठी लिहिलेल्या कविता श्रवण करताना उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी आले.
तिसरे सत्र– “मनातला श्रावण” श्रावणातील निसर्ग, विरह, आठवणी, पावसाच्या सरी आणि नात्यांची उब या विषयांभोवती गुंफलेलं हे सत्र एक नाजूक आणि सौंदर्यपूर्ण काव्यविष्कार ठरला. ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत दढेकर यांनी अभिवाचनाद्वारे मराठी भाषेचं सौंदर्य रसिकांसमोर सादर केलं. त्यांनी निवडलेला उतारा, त्यातील लालित्यपूर्ण भाषा, संयत आवाजात केलेलं सादरीकरण आणि आरोह-अवरोहाने भरलेला उच्चार हे सर्व एकत्र येऊन तो क्षण भारावलेला झाला.
कार्यक्रमात एक वेगळाच भावस्पर्शी क्षण म्हणजे ओमकार गणेश खाडे या लहानशा बालकाने सादर केलेली प्रार्थना. अत्यंत स्पष्ट आणि आत्मविश्वासपूर्ण आवाजात सादर केलेल्या या प्रार्थनेनं सर्व रसिकांची मनं जिंकली. त्याच्या निरागसतेतून आलेलं माधुर्य सभागृहात दरवळून गेलं.
कविसंमेलनात अनेक कवी व कवयित्रींनी आपल्या स्वरचित कविता सादर केल्या. त्यात सहभागी झालेले कवी डॉ. मानसी पाटील, अशोक (भाई) पुंडलीक नार्वेकर, कल्पना दिलीप मापूसकर, विक्रांत मारूती लाळे, संतोष धर्मराज मोहिते, आश्विनी सोपान म्हात्रे, वैभवी विनीत गावडे, उत्तम कुलकर्णी, अनिल विनोद भोईर, नंदन भालवणकर, सुचिता बागडे-खाडे, प्रा. नागेश सोपान हुलवळे, शितलादेवी सुनिल कुळकर्णी, प्रमोदिनी अनिल देशमुख, सरोज लट्टू, प्रीती तिवारी, राजेश साबळे ओतूरकर, अक्षता रणजित गोसावी, डॉ. स्नेहा समीर राणे, छाया धर्मदत्त पाटील, मेघना दीपक सावंत, रविंद्र शंकर पाटील, नितीन सुखदरे, सनी आडेकर.
प्रत्येक कवितेचा श्री. लट्टू, दिलीप राणे, गणेश खाडे आणि डॉ. अनुज केसरकर यांनी रसग्रहणपूर्वक आस्वाद घेतला. सर्व सहभागी कवींना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी एकत्रित छायाचित्रही घेण्यात आले.
कार्यक्रमाचे नेमके व प्रभावी सूत्रसंचालन विक्रांत लाळे यांनी केले. रविंद्र पाटील यांनी तांत्रिक बाजू नेटकी सांभाळली. कार्यक्रमादरम्यान गरमागरम चहा आणि बिस्किटांचा आस्वाद उपस्थित रसिकांनी घेतला. यासाठी नंदन भालवणकर, नितीन सुखदरे आणि सनी आडेकर यांनी सहकार्य केले.
गुरुदत्त दिनकर वाकदेकर (संस्थापक/अध्यक्ष– मराठ साहित्य व कला सेवा), नितीन सुखदरे (अध्यक्ष– शोध आनंदाचा फाऊंडेशन) आणि सनी आडेकर (सचिव– शोध आनंदाचा फाऊंडेशन) यांच्या समर्पित संयोजन आणि सातत्यामुळेच हा सोहळा यशस्वी झाला. सहभाग प्रमाणपत्रावरील सर्व नावे वैभवी गावडे यांनी आपल्या देखण्या हस्ताक्षरात लिहून दिली, यासाठी त्यांचे विशेष आभार मानण्यात आले.
या यशस्वी कविसंमेलनानंतर येणाऱ्या ता. ३ ऑगस्ट २०२५ रोजी अठराव्या कविसंमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याविषयी सविस्तर निवेदन लवकरच प्रसारित केले जाणार आहे. ‘आपली कविता, आपली ओळख’ पुन्हा एकदा साहित्याच्या व्यासपीठावर उमटवण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन करण्यात आले.
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.