खंडाळा | १७ फेब्रुवारी | गुरुदत्त वाकदेकर
(Mumbai news) शाहिरी लोककला मंचचे समन्वयक ज्येष्ठ कथा लेखक आणि राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे प्रसिद्धी प्रमुख काशिनाथ माटल यांनी कोरोना काळात, निरपेक्षपणे काम करणाऱ्या कोविडयोद्धांच्या समर्पित जीवनावर साकारलेल्या नऊ उत्कंठावर्धक कथांचा समावेश असलेल्या ‘सावट’ कथासंग्रहाचे ता. २१ ते २३ फेब्रुवारी या काळात दिल्लीत पार पडणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रकाशन होणार आहे. त्यानिमित्त खंडाळा येथे पार पडलेल्या मंचच्या कलाकारांच्या सर्वसाधारण सभेत काशिनाथ माटल यांचा हृद्य सत्कार करण्यात आला.
(Mumbai news) मंचचे अध्यक्ष शाहीर शांताराम चव्हाण, सरचिटणीस शाहीर मधु खामकर यांच्या हस्ते काशिनाथ माटल यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन गुणगौरव करण्यात आला. मंचचे अंतर्गत हिशोब तपासणीस रवींद्र पारकर यांनी ‘स्वतःलाच रचित गेलो’ हे उत्कृष्ट पुस्तक लिहिल्याबद्दल त्यांचाही शाल-श्रीफळाने यथोचित सन्मान करण्यात आला. संस्थेचे समन्वयक आणि लेखक काशिनाथ माटल यांच्या ‘सावट’ या पुस्तकाच्या दिल्ली मराठी साहित्य संमेलनातील प्रकाशनाने आमचा स्वाभिमान द्विगुणित झाला, अशा भावना अनेक कलाकारांनी आपल्या भाषणात व्यक्त केल्या.
(Mumbai news) खंडाळा येथील रा.मि.म. संघाच्या गं.द. आंबेकर स्मृती श्रमसाफल्य प्रशिक्षणालयात शुक्रवार आणि शनिवार असे दोन दिवसाचे शिबिर पार पडले. त्यावेळी गौरव समारंभाबरोबरच शिबीरात आजचे आघाडीचे ज्येष्ठ संगीतकार मनोहर गोलांबरे यांच्या नियोजनाखाली अध्यक्ष शाहीर शांताराम चव्हाण, ज्येष्ठ संगीतकार खजिनदार महादेव खैरमोडे, सरचिटणीस शाहीर मधू खामकर, शाहीर आनंद सावंत, ज्येष्ठ नृत्यांगना सुरेखा काटकर, पत्रकार काशिनाथ माटल आणि नृत्यविशारद गणेश कारंडे यांची समिती नियुक्त करण्यात आली.
समितीच्या नियोजनातून जून्या-नव्या कलेचा मेळ घालून लवकरच रसिकांना आवडेल अशी नव्या रूपात पारंपरिक शाहिरी लोककला मुंबईत सादर करण्यात येणार. कार्यक्रमाला गाढवाचे लग्न फेम शाहीर कमलाकर पाटील, ज्येष्ठ नृत्यांगना सुरेखा काटकर, जुन्या काळातील लोककलेमधील नृत्यांगना मानिक मयेकर आदी कलाकार त्यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी स्वरीता पाटकर, तेजस्वीनी वाडेकर, शर्वरी पवार, गीता गोलांबरे, अरूण थोरात, सुदाम हुलावळे आदी कलाकारांनी चर्चेत भाग घेतला. नव्या ढंगाचा कार्यक्रम मुंबईत मंचच्या वर्धापनदिनाच्या औचित्याने सादर करण्यात येणार आहे.
(Mumbai news) मराठी भाषेला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला, ही गोष्ट लक्षात घेऊन दिल्लीत तालकटोरा येथे मराठी साहित्य संमेलन ‘न भूतो न भविष्यति’ ठरावे, असा प्रयत्न संमेलनाचे निमंत्रक संस्था सरहद्दचे प्रमुख संजय नाहर आणि अन्य सहकारी करत आहेत. दिल्ली ग्रंथ प्रकाशन समितीचे अध्यक्ष, साहित्यिक, प्रकाशक घन:श्याम पाटील यांच्या चपराक प्रकाशनच्या विद्यमाने वैविध्यपूर्ण विषयांवर सर्वाधिक २५ पुस्तके प्रकाशित होत आहेत. त्यात कोविडकाळावर आधारीत पहिलेच ‘सावट’ हे पुस्तक प्रकाशित होत आहे, ही गोष्ट निश्चितच स्वागतार्ह आहे, अशी माहिती संस्थेचे समन्वयक लेखक काशिनाथ माटल यांनी दिली. शिबिरात मंचच्या पुढील वाटचालीवर सांगोपांग चर्चा झाली.
हे ही वाचा : poem | तुझ्या दाराहून जाता…पत्रकार, कवी, गीतकार प्रकाश घोडके यांची MILESTONE कविता