(Literature) साहित्य, विचार आणि सामाजिक अभ्यास यांना एकत्र आणणाऱ्या कार्यासाठी डॉ. सिद्धार्थ लांडे यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा (मसाप) ‘शरश्चंद्र मनोहर भालेराव स्मृती पुरस्कार २०२४’ प्रदान करण्यात आला. ‘सामाजिक आशयाच्या उत्कृष्ट प्रबंधासाठी’ दिला जाणारा हा मानाचा पुरस्कार त्यांना पुण्यात एका समारंभात हिंदीतील ज्येष्ठ लेखिका डॉ. सविता सिंह यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी मंचावर ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे, डॉ. मिलिंद जोशी, सुनीताराजे पवार, शिवाजीराव कदम आणि विनोद कुलकर्णी हे मान्यवर उपस्थित होते.
(Literature) कोल्हार खुर्द गावचे सुपुत्र असलेल्या डॉ. लांडे यांनी ‘अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतून उदयास आलेल्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या वैचारिक साहित्याचा अभ्यास’ या विषयावर पीएच.डी. पदवी प्राप्त केली आहे. त्यांच्या अभ्यासातून सामाजिक जागृती, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विवेकशील विचारांची मांडणी अभ्यासपूर्ण पद्धतीने करण्यात आली.
(Literature) सिद्धार्थ लांडे यांचे परिश्रम हे चिंचोली आणि कोल्हार खुर्द गावांनी प्रत्यक्ष अनुभवल्याने, हा पुरस्कार फक्त त्यांचा नव्हे तर संपूर्ण अहमदनगर जिल्ह्याचा गौरव असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे. विविध स्तरावरून त्यांच्या कार्याचे मोठे कौतुक होत आहे.
सत्कारप्रसंगी सांगण्यात आले की, महाराष्ट्र साहित्य परिषद ही राज्यातील आद्य आणि सर्वात जुनी साहित्य संस्था असून, गेल्या ११९ वर्षांपासून मराठी भाषा, साहित्य, समीक्षा आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी कार्यरत आहे. थोर लेखकांनी आपला मौल्यवान वेळ वाङ्मयसेवेसाठी अर्पण केला, त्यामुळेच मसापला आजचे स्थान मिळाले आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवयित्री अंजली कुलकर्णी यांनी केले, तर सुनीताराजे पवार यांनी आभारप्रदर्शन केले.
डॉ. सिध्दार्थ लांडे
🔖 पुरस्काराचे नाव शरश्चंद्र मनोहर भालेराव स्मृती पुरस्कार.
🏅 पुरस्कारार्थी डॉ. सिद्धार्थ लांडे.
📘 प्रबंधाचा विषय डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या वैचारिक साहित्याचा अभ्यास.
🎓 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पीएच.डी. प्राप्त.
🏡 मूळ गाव कोल्हार खुर्द, ता. राहाता, जि. अहमदनगर.
🏛️ पुरस्कार देणारी संस्था महाराष्ट्र साहित्य परिषद (मसाप).