पुणे | ११.२ | रयत समाचार
(Literature) महाराष्ट्रातील पहिला आणि आगळावेगळा ईद विशेषांक ‘नब्ज़’ यंदा आपल्या पाचव्या वर्षात पदार्पण करत असून समाजात संवाद, सौहार्द आणि सलोखा निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम पुढे जात आहे.
(Literature) दिवाळी अंकांच्या समृद्ध परंपरेतून प्रेरणा घेत २०२१ पासून सुरू झालेला ‘नब्ज़’चा प्रवास आज समाजातील वाढत्या द्वेष, गैरसमज आणि संवादाच्या अभावावर सकारात्मक उत्तर देणारा ठरत आहे.
(Literature) संवादाचा अभाव हेच गैरसमजुतींचे मूळ : आज बहुसंख्यांक समाज आणि मुस्लिम समाज यांच्यात संवाद कमी झाल्याने गैरसमजुतींची दरी वाढत चालली आहे. शेजारी राहूनही एकमेकांच्या भाषा, संस्कृती, खानपान आणि जगण्याच्या पद्धतीविषयी पुरेशी ओळख नाही.
याच पार्श्वभूमीवर, मुस्लिम समाजाला केवळ ‘दाढी-टोपी’च्या चौकटीत न अडकवता, त्यातील साहित्य, प्रगतीशील विचार आणि चांगुलपणा समाजासमोर मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न म्हणजेच ‘नब्ज़’ विशेषांक आहे.
सलोख्याचा पूल उभारण्याचा प्रयत्न : ‘नब्ज़’च्या माध्यमातून समाजातील दोन घटकांमध्ये संवादाची बीजं रुजवण्याचा प्रयत्न सुरू असून, दुराव्याच्या भिंती कोसळून आपुलकीचा पूल उभा राहावा, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
वाचकांच्या वर्गणीवर आधारित उपक्रम : केवळ चार अंकांतच ‘नब्ज़’ला पत्रकार, लेखक, सामाजिक कार्यकर्ते आणि जाणकार वाचकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. मात्र या उपक्रमामागे कोणतीही मोठी संस्था किंवा आर्थिक पाठबळ नाही.
हा संपूर्ण प्रवास वाचकांच्या वर्गणी आणि सहकार्यावर आधारित असून अंकांच्या निर्मितीसाठी आवश्यक किमान खर्च उभारणे अजूनही आव्हानात्मक ठरत आहे.
