Literature | महामानवांच्या विचारांवर श्रद्धा ठेवून शिक्षणाचा दीप कायम प्रज्वलित ठेवणे आवश्यक- प्रा.डॉ. प्रकाश जाधव; तिसरे अखिल भारतीय वडार बोली साहित्य संमेलन संपन्न 

नव्या पिढीला साहित्य आणि शिक्षणक्षेत्रात प्रेरणादायी दिशा देणारे हे संमेलन

उपसंपादक | दिपक शिरसाठ

पुणे | २७.१० | रयत समाचार

अखिल वडार बोली भाषा साहित्य संस्था, कोल्हापूर आणि अखिल वडार बोली साहित्य मंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने २०२५ चे तिसरे अखिल भारतीय वडार बोली साहित्य संमेलन रविवारी ता.२६ ऑक्टोबर रोजी येरवडा येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक कला रंगमंदिर येथे पार पडले.

 

संमेलनाचे मुख्य संयोजक ज्येष्ठ साहित्यिक टी.एस. चव्हाण होते. संमेलनाचे उद्घाटन मनोहर बंदपट्टे यांनी केले. संमेलनाध्यक्ष म्हणून प्रा.डॉ. प्रकाश जाधव यांनी अध्यक्षस्थान भूषविले, तर स्वागताध्यक्ष म्हणून निवृत्त उपायुक्त सुरेश विटकर उपस्थित होते. मुख्य संयोजक टी.एस. चव्हाण यांनी प्रास्ताविकातून वडार बोली भाषेच्या जतनासाठी आणि साहित्यिक अभिव्यक्तीच्या प्रसारासाठी या संमेलनाचे महत्त्व स्पष्ट केले.

 

पहिल्या सत्रात प्रा. गुलाब वाघमोडे यांनी ‘साहित्य आणि समाज’ या विषयावर विचार मांडले. या सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून धर्मराज घोडके, अंबादास मंजुळे, सुधीर पवार, राजू धोत्रे आणि मुक्कारी अण्णा अलगुडे उपस्थित होते.

 

दुसऱ्या सत्रात ‘मराठी साहित्यात चित्रीत झालेले वडार समाजाचे चित्र- वास्तव आणि भ्रम’ या विषयावर प्रा. गणेश फुलारी यांनी व्याख्यान दिले. या सत्राचे अध्यक्ष प्रा. दिलीप जाधव होते. त्यानंतर ‘आरक्षण- दशा व दिशा’ या विषयावर परिसंवाद झाला. परिसंवादाचे अध्यक्ष तुकाराम माने होते. संमेलनाध्यक्ष प्रा.डॉ. प्रकाश जाधव यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात संविधानाचे रक्षण आणि शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, समाजाने महामानवांच्या विचारांवर श्रद्धा ठेवून शिक्षणाचा दीप कायम प्रज्वलित ठेवणे आवश्यक आहे.

 

संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी टी.एस. चव्हाण, हरिषदादा बंडीवडार, अशोक पवार, मनोहर मुधोळकर, शांताराम मनोरे आणि पत्रकार रमेश जेठे यांनी प्रयत्न केले. या संमेलनात दिवसभर साहित्य, कविता, विचार आणि चर्चेचा उत्सव अनुभवायला मिळाला. वडार समाजातील नव्या पिढीला साहित्य आणि शिक्षणक्षेत्रात प्रेरणादायी दिशा देणारे हे संमेलन ठरले.

Share This Article