पिंपरी | ११ ऑगस्ट | प्रदीप गांधलीकर
रश्मी गुजराथी लिखित ‘कळीची फजिती’ या ९ व्या बालकथासंग्रहाचे literature प्रकाशन साक्षी जाधव आणि अस्मानी गुजराथी या शालेय विद्यार्थिनींच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका आणि कवयित्री वंदना इन्नाणी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या; तसेच ज्येष्ठ साहित्यिक प्रदीप गांधलीकर, रवींद्र गुजराथी, सुरेश धायरकर, सुरेश इन्नाणी, रश्मी गुजराथी यांच्यासह अनेक विद्यार्थी प्रकाशन सोहळ्यात सहभागी झाले.
दीपप्रज्वलन आणि सरस्वतीस्तवनाने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. रश्मी गुजराथी यांनी आपल्या मनोगतातून, “कुंभार जसा मातीच्या गोळ्याला आकार देतो तसाच बालसाहित्याच्या माध्यमातून त्यांना सुसंस्कारित करण्याचा मी प्रयत्न करते. मोबाईलच्या वाढत्या आक्रमणापासून मुलांना पुस्तकांकडे वळविणे, हे मला माझे आद्यकर्तव्य वाटते. रोजच्या अन्नाइतकेच वाचनदेखील अत्यावश्यक आहे. कविता आणि कथांमधून विद्यार्थ्यांना नीतिमूल्यांची शिकवण दिली पाहिजे!” अशा भावना व्यक्त केल्या.
याप्रसंगी ‘कळीची फजिती’ या संग्रहातील ‘धनगराचा पोर’ आणि ‘खरा आनंद’ या बालकथांचे अभिवाचन करण्यात आले. त्यावर विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया देत कथा अंत:करणापर्यंत पोहोचल्याचा प्रत्यय दिला.
वंदना इन्नाणी यांनी अध्यक्षीय मनोगतातून, “आज ‘कळीची फजिती’ पुस्तक प्रकाशन सोहळ्यात विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष लेखिकेसमवेत सहभागी होता आले, हा अनुभव त्यांच्यासाठी खूप नवा अन् आनंददायी आहे. आनंद हा बाजारात विकत मिळत नाही; तर दैनंदिन जगण्यातील छोट्या छोट्या गोष्टींतून मिळवायचा असतो. पुस्तकवाचनातून असंख्य विषयांचे ज्ञान मिळते म्हणून पुस्तकांशी मैत्री करा!” असा संदेश दिला.
प्रकाशनानंतर गुणवंत विद्यार्थ्यांना पुस्तके भेट देण्यात आली; तसेच रश्मी गुजराथी यांच्यावतीने सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य प्रदान करण्यात आले. वैष्णोमाता प्राथमिक विद्यामंदिरच्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारीवर्गाने संयोजनात परिश्रम घेतले. सीमा गांधी यांनी विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधत बहारदार सूत्रसंचालन केले. गायत्री गुजराथी यांनी आभार मानले.
कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा
हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.