अकोले | २४ मे | प्रतिनिधी
(Latest news) जम्मू-काश्मीरमधील तिसवाड सेक्टर येथे सुरू असलेल्या सर्च ऑपरेशनदरम्यान दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झालेले अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा गावचे सुपुत्र संदीप पांडुरंग गायकर यांच्यावर त्यांच्या गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. हजारो नागरिकांनी साश्रुनयनांनी त्यांना अखेरचा निरोप दिला. जलसंपदामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
(Latest news) संदीप पांडुरंग गायकर (वय ३२) लष्कराच्या १५ मराठा लाईट इन्फंट्रीमधील १७ राष्ट्रीय रायफल्समध्ये सैनिक पदावर कार्यरत होते. तिसवाड सेक्टर येथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत गुरुवारी ता. २२ मे कर्तव्य बजावत असताना संदीप गायकर यांना वीरमरण आले. ता. २४ मे रोजी सकाळी त्यांचे पार्थिव ब्राह्मणवाडा येथे आणण्यात आले. लष्कर व स्थानिक प्रशासनाच्या उपस्थितीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले.
(Latest news) जवान संदीप गायकर हे वयाच्या २० व्या वर्षी सैन्य दलात भरती झाले होते. त्यांनी गांधीनगर, जम्मू व काश्मीरमधील पुंछ सेक्टर, ५६ राष्ट्रीय रायफल्स, मध्य प्रदेशमधील घाना सागर व युनायटेड नेशन्स येथे सेवा बजावली होती. त्यांच्या पश्चात वडील, आई, पत्नी व मुलगा असा परिवार आहे.
भारतीय लष्कराच्या पथकांनी हवेत बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना मानवंदना दिली. ‘भारत माता की जय’ व ‘शहीद जवान संदीप गायकर अमर रहें’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. मुलगा रिहांस याने त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नि दिला. आ. डॉ. किरण लहामटे, आ. अमोल खताळ, माजी खा. सदाशिव लोखंडे, माजी आ. वैभव पिचड, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, तहसीलदार सिद्धार्थ मोरे, पोलीस निरीक्षक मोहन बोरसे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी स्कॉड्रन लीडर विद्यासागर कोरडे, लष्कराच्या वतीने कर्नल केतन प्रसाद तसेच इतर मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून शहीद संदीप गायकर यांना श्रद्धांजली वाहिली.
”संदीप गायकर यांनी देशासाठी दिलेले बलिदान आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. ब्राह्मणवाडा येथे त्यांचे स्मारक उभारण्यात येईल. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात प्रशासन सहभागी असून कुटुंबीयांना शासन सर्वतोपरी मदत करेल,” अशा शब्दांत पालकमंत्री विखे पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.



