दौंड | १८ मार्च | प्रतिनिधी
(India news) पुणे विकासगटामध्ये निरक्षरांची संख्या कमी करण्यासाठी केंद्रशासन पुरस्कृत उल्हास – नवभारत साक्षरता कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत निरक्षरांच्या नोंदणीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सन २०२४- २५ मध्ये नोंदणी झालेल्या असाक्षरांची पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी येत्या रविवारी ता.२३ मार्च रोजी ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. दौंड तालुक्यामध्ये उल्हास ॲपवर एकूण १५८२ असाक्षरांची ऑनलाइन पद्धतीने नोंद झाली. तालुक्यामधील २८४ केंद्रावर ही परीक्षा सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत घेण्यात येईल. या परीक्षेतील प्रश्नपत्रिकाही पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान यांच्याशी संबंधित असून तीन भागांमध्ये विभागलेली एकूण १५० गुणांची असणार. त्यामध्ये अनुक्रमे वाचन ५० गुण, लेखन ५० गुण व संख्याज्ञान ५० गुण अशी दीडशे गुणांची परीक्षा घेण्यात येणार. परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक भागासाठी ३३% म्हणजे १७ गुण अनिवार्य आहेत व एकूण गुण दीडशेपैकी ३३ % म्हणजे ५१ गुण अनिवार्य असतील. कोणत्याही एका भागाचे ३३ टक्के गुण होण्यासाठी कमी पडलेले जास्तीत जास्त पाच वाढीव गुण देण्यात येतील परंतु तिनही भागांचे मिळून पाचपेक्षा अधिकचे गुण देता येणार नाहीत.
(India news) परीक्षेसाठी ऑनलाईन नोंद झालेले परंतु टॅग न झालेले असाक्षरही परीक्षा देऊ शकतात. परीक्षेला जाताना असाक्षर व्यक्तीने स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो, जन्म तारखेचा पुरावा म्हणून मतदान ओळखपत्र, आधारकार्ड, पॅनकार्ड, बँक पासबुक आदीपैकी कोणतेही एक ओळखपत्र घेऊन जाणे आवश्यक आहे. असाक्षर व्यक्तीने निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर जाऊन २३ मार्च रोजी परीक्षा द्यावी.
“वर्षभर असाक्षरांचा शोध घेतला त्यांचे वर्ग भरविले आहेत. नोंदणीकृत असाक्षर व्यक्तींना परीक्षा केंद्रावर उपस्थित ठेवण्यासाठी मुख्याध्यापक, शिक्षक, केंद्रप्रमुख यांनी आवश्यक ते सर्व प्रयत्न करावे.”
– दत्तात्रय कुदळे,
दौंड तालुका समन्वयक,
उल्लास – नव भारत साक्षरता कार्यक्रम
