आणखी एका प्रतिष्ठित सहकारी बँकेत अशाच प्रकारे अनियमित कर्ज वितरण
अहमदनगर | २२ फेब्रुवारी | प्रतिनिधी
(India news) नगर अर्बन बँकेतील कोट्यवधींच्या घोटाळ्याप्रकरणी तब्बल १०५ आरोपी निष्पन्न झाले. यात आतापर्यंत सुमारे १५ ते २० आरोपींना अटक करण्यात आली. उर्वरित आरोपी आजही उजळ माथ्याने फिरत आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकतीच अर्बन बँकेच्या पिडित ठेवीदारांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन या प्रकरणाच्या सखोल कारवाईबाबत आदेश दिले. तरीही आरोपी मोकाट आहेत. संवेदनशील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात अतिशय कणखर भूमिका घेत कारवाई सुरू केली. दुर्दैवाने नगरमधील या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी तितके गांभीर्य फडणवीस यांच्या गृहखात्याकडुन दिसत नाही, अशी खंत बॅंकेचे जागृत सभासद राजेंद्र चोपडा यांनी व्यक्त केली.
(India news) राजेंद्र चोपडा यांनी म्हटले की, नगर अर्बन बँकेत तत्कालीन चेअरमन दिवंगत माजी खासदार दिलीप गांधी व इतर संचालक मंडळाने तब्बल २९१ कोटी रुपयांचा घोटाळा केला. आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्टमध्येच ही बाब निष्पन्न होऊ सुमारे १०५ आरोपींची नावे निश्चित करण्यात आली. परंतु या प्रकरणात कारवाई ‘कासव गतीने’ ‘चालू’ आहे. फक्त १५ ते २० आरोपींना अद्याप अटक झाली आहे. उर्वरित आरोपी मोकाट फिरत आहेत. आरोपींची अटक, त्यांच्या मालमत्ता जप्तीची कारवाई अद्याप सुरू झालेली नाही. बॅंकेची कर्ज थकबाकी वसुलीसुद्धा ठप्प आहे. परिणामी हजारो ठेवीदार त्यांच्या हक्काच्या पैशापासून वंचित आहेत. त्यांच्यासमोर जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पोलिस प्रशासन, जिल्हा प्रशासन अतिशय धिम्या गतीने कारवाई करत असल्याने या प्रकरणी आरोपींवर कायदेशीर कारवाई कधी होणार आणि सर्वसामान्य ठेवीदारांना न्याय कधी मिळणार? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
(India news) पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संवेदनशीलपणे ठेवीदार, जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन, बॅंकेचे अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन आदेश पारित केले. त्यानुसार आतापर्यंत काय कारवाई झाली याची कोणतीही माहिती ठेवीदार तसेच बॅंक बचाव कृती समितीला दिली जात नाही. दुसरीकडे आरोपी बिनधास्त फिरत आहेत. पोलिसांनी ठरवले तर सगळेच आरोपी चोवीस तासात अटक होऊ शकतात. फरार आरोपी त्यांच्या कुटुंबीयांच्या संपर्कात नक्कीच असतील. यासाठी पोलिसांनी त्यांचे मोबाईल सीडीआर तपासणी केली पाहिजे. आताच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात हे सहज शक्य आहे. राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हेसुद्धा पोलिस तपासात आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरासाठी आग्रही असतात. तरी सुद्धा नगरच्या आर्थिक गुन्हे शाखेला तसेच तपासी यंत्रणेला या मोठ्या आर्थिक घोटाळ्यातील आरोपींचा शोध लागेत नसेल तर हे खूप मोठं दुर्दैव आहे.
या कोट्यवधींच्या घोटाळ्याप्रकरणी आरोपींची मालमत्ता जप्तीची प्रक्रियाही जलदगतीने होणे आवश्यक आहे. आमच्यासारखे बॅंकेचे हितचिंतक यासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहेत. बॅंकेच्या अवसायकांनीही कठोर भूमिका घेतली पाहिजे. कारण नगर अर्बन बँकेतील घोटाळ्यामुळे सर्वसामान्यांचा सहकारी बँकिंग, सहकारी पतसंस्थांवरील विश्वास डळमळीत होऊ लागला आहे.
नगरमध्येच आणखी एका प्रतिष्ठित सहकारी बँकेत अशाच प्रकारे अनियमित कर्ज वितरण झाले आहे. त्याच्या वसुलीचा प्रश्न निर्माण झाला आहे. भविष्यात अशा आर्थिक घोटाळ्यामुळे इतरही सहकारी बँका अडचणीत आल्यसा सर्वसामान्य ठेवीदारांचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते, असे राजेंद्र चोपडा यांनी म्हटले.
Contents