केवल विकमणी यांचे ‘कायद्याने वागा लोकचळवळी’च्या वतीने राज असरोंडकर आणि सहकारी यांनी केले अभिनंदन
ठाणे | २१ डिसेंबर | प्रतिनिधी
(Human Rights) जिल्ह्यातील अंबरनाथ येथील केवल विकमणी हा तरुण क्रिकेटचे टर्फ शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हददीत चालवित होता. ता.२० मे २०२३ रोजी त्यांच्या टर्फमध्ये क्रिकेटचा सामना सुरु असताना शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुहास विठ्ठल पाटील यांनी पोलीस गाडीने आपल्या कर्मचाऱ्यांसह येऊन केवल विकमणीसह सर्व खेळाडूंना घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करत, मारहाण करुन २०० उठाबशा मारण्यास लावलेल्या होत्या. हा व्हिडीओ सोशल मिडीयावर त्यावेळी प्रचंड व्हायरलदेखील झाला होता. त्यापुर्वीदेखील केवल विकमणी यांना मारहाण करुन त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात आली होती.
(Human Rights) हप्ता न दिल्यामुळे मारहाण करुन चुकीची वागणूक दिली, म्हणुन केवल विकमणी यांनी शासनाच्या विविध विभागाकडे तक्रारी केलेल्या होत्या. त्या तक्रारीवर कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे केवल विकमणी यांनी अधिवक्ता गणेश घोलप यांचेमार्फत ‘राज्य मानवी हक्क आयोग‘कडे तक्रार केली. त्या तक्रारीवर ठाणे शहर पोलीस आयुक्तांसह उल्हासनगरचे डीसीपी व अंबरनाथचे एसीपी यांचेसह समर्थ पोलीस स्टेशन, पुणे येथे नियुक्तीस असलेले पोलीस उपनिरीक्षक सुहास विठठ्ल पाटील यांना नोटीस काढुन शपथपत्र सादर करण्याचे निर्देश केले होते.
सुनावणी दरम्यान राज्य मानवी हक्क आयोगाने व्हिडीओ चित्रीकरण, सुहास पाटील यांच्याविरोधात झालेली कार्यवाही आदींचे अवलोकन करुन पोलीस उपनिरीक्षक सुहास विठ्ठल पाटील यांनी ६ आठवड्यात केवल विकमणी यांना ५ लाख रुपये नुकसान भरपाईपोटी देत सुहास पाटीलविरोधात भादवि कलम ४४८ व इतर नुसार गुन्हा नोंदविण्याचे, तसेच त्यांची खातेनिहाय चौकशी करत त्यांच्याविरोधात दोषारोपपत्र सादर करण्याचे निर्देश ठाणे पोलीस आयुक्तांना दिले.
महाराष्ट्र पोलीसांना दर महिन्याला सेमिनार व प्रोगाम घेऊन लोकांशी चांगली व मदतपुर्ण वागणूक करण्याचे निर्देश पोलीस महासंचालकांना दिले आहेत, अशी माहिती मिडीया भारत व कायद्याने वागा लोकचळवळीचे राज असरोंडकर यांनी दिली.
पोलिसांची मनमानी, मुजोरी, पदाचा दुरुपयोग, अत्याचाराविरोधात न घाबरता लढणाऱ्या केवल विकमणी या युवकाचे कायद्याने वागा लोकचळवळीच्या वतीने राज असरोंडकर आणि सहकारी यांनी अभिनंदन केले आहे.

Contents
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.